नागपूर : कपीलनगरचे ठाणेदार अशोक कोळी यांचे पिस्तूल२२ ऑक्टोबरला हरवले होते. तिचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत पण महिन्याभरानंतरही तिचा शोध लागला नाही. त्यामुळे कोळी याचे पिस्तूल हरविले की आणखी काही भानगड आहे? अशी चर्चा सुरू झाली आहे.
गहाळ सर्व्हिस रिव्हॉल्वरचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत ४० सीसीटीव्हीतील चित्रीकरण तपासले. ७१ वाहन चालक आणि शेकडो लोकांची चौकशी केली. संशयित ठिकाणाची पाहणी करून झुडूप आणि गवतामध्ये शोध घेतला. मात्र, पिस्तूल सापडले नाही.
हेही वाचा… बुलढाणा : खामगाव तालुक्यात अवकाळी व गारपिटीचे थैमान; वीस मेंढ्या दगावल्या
कपीलनगरचे ठाणेदार अशोक कोळी हे रविवारी २२ ऑक्टोबरला साप्ताहिक सुटीच्या दिवशी सकाळी स्वतःच्या कारने मौद्याला जात असताना त्यांचे सर्व्हिस रिव्हॉल्वर पाच काडतुसांसह गहाळ झाले. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी हरविल्याची नोंद केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त विजयकांत सागर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे तपास करीत आहेत. बेलतरोडी, कपीलनगर, हुडकेश्वर, गुन्हे शाखा युनिटचे अधिकारी याशिवाय ग्रामीण पोलिसांचे पथक असे जवळपास ३० अधिकारी, कर्मचारी पिस्तुलाचा शोध घेत आहेत. मात्र, एकाही अधिकाऱ्याला साधी माहितीही काढता आली नाही. पिस्तूल न सापडल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवरही संशय निर्माण झाला आहे.
हेही वाचा… वृद्ध कलावंतांचे कडाक्याच्या थंडीत आंदोलन; निवड समिती स्थापन करण्याची मागणी
पिस्तूल भंडारा- जबलपूर हायवेवर पडले असावे, अशी शंका आहे. पथकाने या मार्गावरील ढाबे, हॉटेल, पेट्रोलपंप, बांधकाम मजुरांची विचारपूस केली. त्यांना संपर्क नंबर दिले. गोटाळ पांजरी व माथनी टोल नाक्यावरून कोळींच्या कारमागे असलेल्या ७१ वाहन चालकांचे मोबाईल नंबर मिळवून विचारपूस केली. सिंगापूर सिटी बेलतरोडी ते मौदा हे अंतर ४५ किमी आहे. त्यापैकी आनंद हॉटेल बिडगाव ते मौदापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे शोधले. आनंद हॉटेल बिडगाव ते मौदा हे अंतर ३० किमी आहे. १५ किमीपर्यंत सलग फुटेज प्राप्त झाले आहेत. सर्विस रोडकडून आलेले वाहने व गोटाळ पांजरी टोल नाका येथील चित्रीकरण तपासले जात आहेत.