नागपूर : प्रत्येक पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत अनेक बड्या नेत्यांची नावे असतात. प्रत्येकाची भाषणाची शैली निराळी असते. काही आक्रमकपणे मुद्दे मांडतात तर काही संयमीपणे त्यांची भूमिका मांडत पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन करतात. गर्दीची नाळ सर्वांनाच कळते असे नाही. पण वैदर्भीय ‘मास्तर’ व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते नितेश कराळे यांच्या ग्रामीण बोली भाषेतील प्रचारसभांना मिळणारा प्रतिसाद लोकसभा निवडणुकीत चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे तिसऱ्या टप्प्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सभा त्यांनी गाजवल्या. बारामतीमधील सुप्रिया सुळे यांच्या सांगता सभेत त्यांनी केलेले भाषणही गाजले.
मुळचे वर्धा जिल्ह्यातील नितेश कराळे हे स्पर्धा परीक्षेला बसलेल्या मुलांना शिकवता. त्यांच्या शिकवण्याच्या शैलीचे व्हिडीओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने ते सर्वदूर ओळखले जाऊ लागले. पदवीधर मतदारसंघात त्यांनी निवडणूकही लढवली. सर्वप्रथम प्रस्थापित राजकीय पक्षांनी दुर्लक्षित केलेली त्यांची उमेदवारी पदवीधरांमध्ये दखलपात्र ठरली. त्यांनी घेतलेल्या निर्णायक मतांमुळे या मतदारसंघातील निकाल वेगळा लागला. ते पराभूत झाले तरी त्यांनी घेतलेल्या मतांमुळे त्यांनी सर्व राजकीय पक्षांचे लक्ष वेधून घेतले. तेथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. नौकर भरतीच्या मुद्यावर त्यांनी आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी थेट मुंबईत ते शरद पवार यांना भेटले व त्यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश केला. पक्षाने त्यांच्यावर प्रचाराची जबाबदारी सोपवली. त्यांच्या भाषणाला मिळणारा प्रतिसाद बघून महाविकास आघाडीतील घटक पक्ष अनुक्रमे काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाकडूनही त्यांच्या सभेची मागणी होऊ लागली.
हेही वाचा – नागपूर : महापालिकेकडूनच अतिक्रमणाचा ‘छुपा’ परवाना? खाद्यापदार्थ विक्रेते जुमानेना
पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भात, दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भात त्यांनी सभा घेतल्या. नागपूर, रामटेक, अमरावती, चंद्रपूर येथील सभा त्यांनी गाजवल्या. तिसऱ्या टप्प्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातही त्यांच्या सभा झाल्या. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सांगता सभेत त्यांचे भाषण झाले. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ग्रामीण भाषेत थेट प्रश्न विचारण्याची त्यांची शैली लोकांच्या मनाला भिडणारी असल्याने ‘कराळे मास्तर’ आता स्टार प्रचारक म्हणून ओळखले जाऊ लागले.