अमरावती : आग लागलेल्‍या सदनिकेत स्‍वत:ला झोकून देत सिलिंडर बाहेर काढून ७० कुटुंबांचे रक्षण करणाऱ्या येथील करिना थापा हिला नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला. आता करिनाने रविवारी मुंबईत पार पडलेल्या प्रो प्रिमिअर लिग या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेतही सुवर्णपदक प्राप्त करून महाराष्‍ट्राच्‍या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रो प्रिमिअर लिगच्‍या वतीने मुंबईतील मिहिर सेन क्रीडा संकुलात राष्‍ट्रीय बॉक्सिंग स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले होते. रविवारी पार पडलेल्‍या सामन्‍यांत १७ वर्षीय करिना हिने १९ वर्षे वयोगटाच्‍या आतील ५० ते ५५ किलोग्रॅम वजन गटात उत्‍तर प्रदेशच्‍या प्रतिस्‍पर्ध्‍याला पराभूत करून सुवर्णपदक पटकावले. त्‍याआधी उपांत्‍य सामन्‍यात तिने राजस्‍थानच्‍या स्‍पर्धकाचा पराभव केला होता. मार्शल आर्ट क्रीडा प्रकारातील स्‍पर्धा या क्रीडा संकुलात घेण्‍यात आल्‍या होत्‍या. करिनाने किकबॉक्सिंग या प्रकारात कौशल्‍य दाखविले. या स्‍पर्धेत विविध राज्‍यांमधील ८०० स्‍पर्धक सहभागी झाले होते.

हेही वाचा >>>नववर्षातील तुमचे राशिभविष्य कसे असेल? विवाह मुहूर्त आणि बरेच काही जाणून घ्या आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्यकडून

करिना ही अमरावती बॉक्सिंग क्‍लबची सदस्‍य असून गौरव वानखडे हे तिचे प्रशिक्षक आहेत. या यशाबद्दल अमरावती बॉक्सिंग क्‍लबच्‍या सचिव सविता बावनथडे आणि करिना हिचे मार्गदर्शक नरेंद्र तायडे यांनी करिनाचे अभिनंदन केले आहे.

कठोरा परिसरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल शेजारील जय अंबा अपार्टमेंटमध्ये १५ मे २०२४ च्या सायंकाळी ६ वाजता एक दुर्घटना घडली होती. अपार्टमेंटच्या ‘बी-विंग’ मधील दुसऱ्या माळ्यावरील सदनिकेमधून धूर निघत असल्याचे दिसताच घरकाम करणाऱ्या करिना थापाने बंद असलेल्या शेजारच्या सदनिकेचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मात्र, आग आणि धुराचे लोट येत असतानाही पाण्याच्या बादल्यांचा सतत मारा करत तिने सिलेंडर शेजारील आग विझवून सिलेंडर बाहेर काढले. अशात सिलेंडरचा स्फोट कधीही होऊ शकला असता. करिनाच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला व अपार्टमेंटचे रक्षण झाले.

हेही वाचा >>>३ जानेवारीला पृथ्वी ते सूर्याचे अंतर राहणार सर्वांत कमी !

या सर्व घटनाक्रमात धाडस व समयसूचकता दाखविणाऱ्या करिनाच्या या अनन्यसाधारण कार्याची दखल घेत जिल्हा महिला व बाल विकास विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाला पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविला होता.

धुरांचे लोट, गरम टाईल्स आणि श्वास गुदमरवणाऱ्या स्थितीचा यशस्वी सामना करून जिवाची पर्वा न करता धाडस करणाऱ्या करिना थापा हिने राष्ट्रीय स्पर्धेतही यश मिळवल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kareena thapa awarded prime minister national children award by the president mma 73 amy