नागपूर : १४७ प्रकारच्या प्रजातीचे पक्षी… हिवाळ्यात ३७ प्रकारच्या प्रजातीचे स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर असलेला कर्नाळा पक्षी अभयारण्य आता आणखी फुलणार आहे. निसर्गाचे देणे लाभलेल्या या अभयारण्याने पक्षीप्रेमींनाही ओढ लावली आहे. त्याच पक्षीप्रेमी पर्यटकांसाठी वनखाते सरसावले असून निसर्ग पर्यटनाचा परिपूर्ण विकास आराखडा तयार होत आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
२०१९ मध्ये कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या ११.६५ कोटी रुपयांच्या निसर्ग पर्यटन आराखड्याला तत्त्वत: मान्यता देण्यात आली होती. कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेलपासून १२ किलोमीटर तर मुंबईपासून ६५ किलोमीटर अंतरावर आहे. हे अभयारण्यच नाही तर इथला कर्नाळा किल्ला पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. १२.१०९४ चौरस किलोमीटरच्या अभयारण्यात केवळ पक्षीच नाही तर ६४२ वृक्षप्रजाती, ११ प्रकारचे सस्तन प्राणी, २३ प्रकारचे साप, पाच प्रकारचे सरडे आणि बेडूक, १० प्रकारचे कोळी आणि फुलपाखरांच्या ५६ प्रजातीही येथे अस्तित्वात आहेत.
काय असणार आराखड्यात?
महिला-पुरूष प्रसाधन, सुरक्षा कक्ष, थिएटर, ट्री हाऊस, लाकडी डेक, शयनगृह, कुटीर यांचाही नवीन आराखड्यात समावेश असणार आहे. शिवाय कर्नाळा किल्ल्याची डागडुजी, दुरूस्ती देखील करण्यात येणार आहे. आराखड्यामध्ये ॲडव्हेंचर पार्क, मुलांची खेळाची जागा, धबधबे, पुलांची दुरूस्ती, पाथवे, बचत गटांचे कॅन्टीन, प्रवेशद्वारावर आणि परिसरात सीसीटीव्ही, विद्युतीकरण, पक्षी निरीक्षण पॉईंट आदींचा समावेश आहे.