नागपूर : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भाषा उद्दामपणाची आहे. मराठी भाषिकांवर अन्याय केल्यास त्यांना उन्हाळ्यात दिल्या जाणाऱ्या पाण्याबाबत विचार करू, असा इशारा उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी कर्नाटक सरकारला दिला. विधान भवन परिसरात ते पत्रकारांशी बोलत होते. देसाई पुढे म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हे भडकविणारे आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत झालेल्या चर्चेला अनुसरून नाही. सीमावर्ती भागातील जनतेला घाबरण्याचे कारण नाही. त्यांच्या पाठिशी राज्यातील संपूर्ण जनता आहे. एक इंच काय आम्ही अर्धा इंचही जागा देणार नाही. अरेरावीची भाषा थांबविली नाही, तर त्याच्यापेक्षा शंभर पट जास्त आम्हाला बोलता येते.
हेही वाचा: ‘एक वोट कि किमत तुम क्या जानो…’; केवळ एका मताने सरपंचपदाचा उमेदवार विजयी
छत्रपतींचा दक्षिण दिग्विजय विसरू नका!
छत्रपत्री शिवाजी महाराज यांनी दक्षिण दिग्विजय केला होता. याची आठवण त्यांना असावी. मार्च, एप्रिल व मे महिन्यात त्यांना पाण्याची गरज असते. राज्यातील कोयना व कृष्णा नदीतून पाणी देण्यात येते. पाण्यासाठी त्यांच्याकडून राज्याला विनंती करण्यात येते. त्यांचे वागणे असेच राहिले तर उन्हाळ्यात देण्यात येणारे पाणी द्यायची की नाही याबाबत विचार करावा लागेल, असेही देसाई म्हणाले.