वर्धा : परिस्थितीअभावी स्वप्न पूर्ण न होणारे अनेक. पण त्यावर मात करीत आईवडिलांना निराश न करण्याचा निर्धार ठेवणारे पण काहीजण असतात.हाच निर्धार कारंजा घाडगे येथील कार्तिक राजू बाजारे याने ठेवला. आता त्याची भारताच्या नौदलात सब लेफ्टनंट या अधिकारी पदावर निवड झाली आहे.पासिंग परेड मध्ये तो निवडल्या गेल्यावर त्यास नौदलाची कॅप प्राप्त झाली. तर ती प्राप्त होताच समारंभास उपस्थित आईच्या डोक्यावर चढवून सलाम ठोकला.
त्याचा इथवरचा प्रवास हा फक्त आणि फक्त आईच्या त्यागावर व प्रेरणे वर झाल्याची त्याची भावना आहे. कारंजा पंचक्रोशीत या पदावर पोहचलेला तो पहिलाच. गावातच प्राथमिक शिक्षण झाले. तेव्हाच सैन्यदलात जाण्याचे ठरविले. दहावी उत्तीर्ण झाल्यावर मग स्वप्न खुणावू लागले. घरची स्थिती बेताची.वडील एका खाजगी कंपनीत तुटपुंज्या पगाराच्या नौकरीवर. म्हणून व्यावसायिक शिक्षणाच्या वाटेला नं जाता त्याची आवड म्हणून कुटुंबाने कार्तिकला शहापूर येथील डिफेन्स अकॅडमीत एनडीए परीक्षेच्या तयारीस पाठविले.
हेही वाचा…उपमुख्यमंत्री असताना दिलेली हमी पूर्ण झाली नाही, आता मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीस…
ही पहिली संधी वैद्यकीय चाचणीत निवड नं झाल्याने हुकली. मात्र त्याच तयारीच्या आधारे त्याने इंडियन नेव्ही टेकएंट्री अंतर्गत सैन्यदल अधिकारी होण्याचे ठरविले. तयारी केली. येथे मुलाखत झाली. त्यात उत्तीर्ण झालेल्या कार्तिकला मग केरळमधील एझीम येथे असलेल्या इंडियन नेव्हल अकॅडमी येथे प्रशिक्षणास पाठविण्यात आले.बारा महिन्याचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. आणि सब लेफ्टनंट पदावर अखेर निवड झाली. पासिंग आऊट परेड म्हणजेच दीक्षांत सोहळा झाला, तेव्हा कार्तिकची आई ज्योत्स्नाताई व वडील राजू बाजारे व मित्र पण उपस्थित होते. तेव्हा परेड मधील ऐटीत चालेल्या पुत्राचे त्यांना भारी कौतुक वाटले. आईच्या डोळ्यातील अश्रू त्याची साक्ष. मोकळा झाल्या बरोबर कार्तिक आईकडे धावला. हे तुझेच यश म्हणत आपली कॅप तिच्या डोक्यावर घातली आणि सलाम ठोकला. कार्तिक म्हणतो की माझी वाटचाल आईच्या त्यागावर उभी आहे. माझ्यासाठी तिने केलेला त्याग, तडजोडी शब्दात नाही सांगू शकत. १०० टक्के श्रेय तिलाच.आता एक उत्तम नौसैनिक होण्याचा हवा तो प्रयास करणार. माझ्या देशास व कुटुंबास खाली पाहावे लागणार, असे कृत्य घडणार नाही. देशाभिमानी अधिकारी म्हणून नाव कमविणार.