वर्धा:  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणजे चालता बोलता ज्ञानकोष, असे त्यांच्या बाबतीत म्हटले जाते. त्यांची प्रत्येक विषयावर ठाम मते असतात. आता त्यांनी गायीबाबत नवाच दृष्टिकोन सांगितला. येथील पशू व पर्यावरणप्रेमी तसेच करुणाश्रमचे संचालक आशीष गोस्वामी हे आज दुपारी वेळ घेऊन गडकरी यांच्या नागपूर स्थित घरी पोहचले. त्यावेळी असलेली अभ्यागतांची गर्दी ओसरली आणि गडकरी यांनी घाई करू नका, म्हणत विषयास हात घातला.

यापूर्वी करुणाश्रम येथील गडकरी यांची भेट घाईत झाल्याने माहिती अपूर्ण राहिली. म्हणून येथील गो संगोपनाचे उपक्रम त्यांना या भेटीत सांगण्यात आले.  तेव्हा गडकरी यांच्यातील गोप्रेमी जागा झाला. ते म्हणाले की, गायीस धार्मिक स्वरूपातच पाहू नका. तिची उपयुक्तता ओळखा. भाकड गायी कत्तलखान्यात जातात म्हणून ओरड होते. पण जाऊ नये म्हणून काय केले पाहिजे याचा विचार झाला पाहिजे. अशा गायीची दूध देण्याची क्षमता वाढविण्याचे उपाय आहेत.  काही खाजगी कंपन्यांकडू त्याची माहिती आहे. ती घ्या व आपल्या निरूपयोगी समजल्या जाणाऱ्या गायीचे मूल्य वाढवा. आपोआपच गायीवरील आस्था वाढेल. तिचे संरक्षण केले जाईल. सर्वात उपयुक्त पशू म्हणून गायीचे जतन झाल्यास कत्तल होणार नाही.

गो पर्यटन हा नवा मुद्दा गडकरी यांनी मांडल्याचे गोस्वामी म्हणाले. म्हणजे निगा राखून गायी पोसल्या पाहिजे. अनेकांना धार्मिक भावनेतून गायीस आंघोळ घालण्याची इच्छा असते. आपल्याकडे तशी सुविधा निर्माण करा, लोक वळतील  भेट देण्यास. दुधाचे विविध उत्पादन तयार करा. गायीकडे केवळ धार्मिक दृष्टीने न पाहता वैज्ञानिक दृष्टी ठेवून उपयुक्तता बघा, असा सल्ला गडकरी यांनी दिला. लांबती भेट शेवटी त्यांच्या सहकाऱ्यास भेटण्याची सूचना करीत आटोपली. केवळ औपचारिक असलेल्या या भेटीला नितीन गडकरी यांनी एक नवी दृष्टी दिल्याचे गोस्वामी म्हणाले. सोबत असलेले गगन आंबटकर यांना गोशाळा आत्मनिर्भर करण्याबाबत सुचविले. या भेटीत गोस्वामी यांनी सुप्रसिद्ध गोरसपाक  गडकरी यांनी भेट दिली.  गोरसपाक हा केवळ वर्धेपुरता मर्यादित राहू नये. तो देशभर गेला पाहिजे.  या खाद्याचे चांगले मार्केटिंग होणे आवश्यक असल्याची भूमिका गडकरी यांनी मांडली.