काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी चार वाजता झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नागपूरच्या रुपचंदानी कुटुबातील महिला जखमी झाली आहे. दरम्यान काश्मीरमध्ये नागपूरहून पर्यटनासाठी गेलेल्यांची संख्या ४० ते ५० असून त्यांच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला आहे. हे सर्व यात्रेकरू सुखरूप आहेत, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी सांगितले.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. उन्हाळ्यात तेथे पर्यटकांची गर्दी असते. देशभरातून पर्यटक तेथे जातात. यंदाही मोठ्या प्रमाणात पर्यटक तेथे गेले. दुर्दैवाने मंगळवारी तेथे दहशतवादी हल्ल्याची घटना घडली. महाराष्ट्रातील सहा पर्यटकांची हत्या झाली. ही बातमी पसरताच नागपूरहून काश्मीरला गेलेल्या पर्यटकांच्या कुटुंबामध्ये चिंतेचे वातावरण पसरले. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालात याबाबत माहिती देण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला. तेथे मंगळवारी रात्रीपासून काश्मीरमध्ये गेलेलेल्या ४० ते ५० पर्यटकांच्या नातेवाईकांनी संपर्क साधला, रुपचंदानी कुटुंबातील एक महिला जखमी आहे. बाकी सर्व पर्यटक सुखरूप आहेत. सध्या श्रीनगरला आहे. उद्या तेथून निघणार आहेत, असे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी सांगितले.

काश्मिरातील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या क्षणी एक नागपूरकर कुटुंबसुद्धा तेथे होते. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांनी पहाडावरुन उड्या मारल्या आणि त्यात घसरुन सिमरन रुपचंदानी या जखमी झाल्या आणि त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्यासमवेत तिलक आणि गर्व रुपचंदानी हेसुद्धा आहेत. तिघेही सुखरुप आहेत. त्यांच्याशी संपर्क झाला असून, त्यांना सर्व ती मदत पुरविण्यात येत आहे, असे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले होते.