Katol Assembly Election 2024 : काटोल हे नागपूर जिल्ह्यातील शहर असून ते जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी एक आहे. काटोल हे संत्रा व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे. कापूस, सोयाबीन आणि इतर काही पिकांचे या क्षेत्रात उत्पादन घेतले जाते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. देशमुख हे चारवेळा काटोल मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काटोल मतदारसंघातून अनिल देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु देशमुख यांनी माघार घेतली. त्यांचे पुत्र सलील देशमुख हे काटोल मतदारसंघातून निवडणुकीला उभे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनी लॉन्ड्रिंगचे आरोप

अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. २०१९ ते २०२१ साली महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी गृहमंत्री पद भूषविले होते. मात्र मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपानंतर त्यांनी २०२१ साली गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली होती.

हेही वाचा – Prakash Ambedkar : ‘विधानसभेच्या निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण थांबवलं जाणार’, प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा

अनिल देशमुख हे १९९५ साली पहिल्यांदा अपक्ष उमेदवार म्हणून काटोल मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले होते. १९९५ मध्ये त्यांनी भाजप शिवसेना सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम केले. नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पुढे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरकारमध्ये त्यांनी विविध मंत्रिपदांवर काम केले. देशमुख यांनी शिक्षण आणि सांस्कृतिक, क्रीडा आणि युवा व्यवहार, माहिती आणि जनसंपर्क राज्यमंत्रीपद भूषविले. सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्रीपदही सांभाळले.

मुलाला उमेदवारी

राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे २०२४ विधानसभा निवडणुकीसाठी काटोल मतदारसंघातून अनिल देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांनी माघार घेतली. देशमुख यांनी माघार का घेतली याचे कारण अस्पष्ट आहे. त्यांच्याऐवजी सलील देशमुख हे काटोल मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे आहेत. उमेदवार बदलाने मतदारसंघातील राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – पाच वर्षांत मंत्र्यांच्या संपत्तीमध्ये प्रचंड वाढ, वाचा कोणत्या मंत्र्यांची संपत्ती किती वाढली?

सलील देशमुख यांच्यासमोर कोणते आव्हान ?

अनिल देशमुख यांनी २०१४ पर्यंत काटोल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख हे त्यांचे पुतणे आशिष देशमुख यांच्याकडून पराभूत झाले. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली व आपला बालेकिल्ला परत मिळवला. २०२४ च्या निवडणुकीत अनिल देशमुख यांच्याऐवजी त्यांचे पुत्र सलील देशमुख निवडणूक लढत आहेत. त्यांच्यासमोर भाजपा, आणि मनसेचे आव्हान आहे. भाजपाकडून चरणसिंग ठाकुर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मनसेकडून सागर दुधाने यांनी सलील देशमुख यांच्याविरुद्ध दंड थोपटले आहेत. भाजपकडून आशिष देशमुख यांना या मतदारसंघातून उभे केले जाऊ शकते अशी चर्चा होती, मात्र आशिष देशमुख यांना भाजपाने सावनेर मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katol assembly constituency will anil deshmukh retain the fort in the assembly elections ssb