नागपूर : चांगली नोकरी मिळावी म्हणून नागपूरच्या बेसा भागात राहणारा कौस्तुभ काळे हा युवक पुण्याला मुलाखत देण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी बैद्यनाथ चौक येथील विदर्भ ट्रॅव्हलने नागपूरवरून निघाला. सिंदखेडजवळ झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. आपला भाऊ येणार आणि नागपूरवरून पुण्याला सकाळी पोहोचणार म्हणून त्याचा मामेभाऊ त्याला घेण्यासाठी सकाळी पोहोचला, मात्र त्याची गाडी आलीच नाही. त्याने विचारपूस केली तर त्याला अपघाताची माहिती मिळाली आणि तो सुन्न झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेसा भागात राहणारा कौस्तुभ काळे हा नागपूरला एका खाजगी कंपनीत डिलीवरी बॉय म्हणून नोकरी करत होता. कौस्तुभ हा एकुलता एक भाऊ आणि दोन बहिणी आहे. आई-वडील म्हातारे आहे. त्यामुळे घरची सगळी जबाबदारी त्याचावर होती. डिलीवरी बॉय म्हणून नोकरी करत असताना चांगली नोकरी मिळावी म्हणून पुण्याला तो एका खाजगी कंपनीत मुलाखत देण्यासाठी तो निघाला. आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन आणि बहिणीला सांगून बैद्यनाथ चौकातून ट्रव्हल बसने निघाला आणि शनिवारी सकाळी ट्रव्हल्सचा अपघात झाला एवढीच बातमी त्याच्या कुटुंबियांना कळली.

हेही वाचा – Buldhana Accident : अकरा मृतांची ओळख पटली; नागपुरातील चौघांचा समावेश

कौस्तुभची मोठी बहीण सकाळी बुलढाण्याकडे जाण्यासाठी रवाना झाली. तिला कौस्तुभ अपघातात गेला याची माहिती नाही. कौस्तुभचे आई-वडील घरी असून त्यांना दुपारपर्यंत याबाबत काही माहिती नाही. दरम्यान कौस्तुभच्या बहिणीशी संपर्क केला असता तिने सांगितले, तो चांगली नोेकरी मिळावी म्हणून मुलाखतीसाठी पुण्याला जातो म्हणून पुण्याला गेला. रात्री १ वाजून २० मिनिटांनी त्यांचे बोलणे झाले. सकाळी पुण्याला पोहोचलो की फोन करतो असे त्याने सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kaustubh kale died in bus accident on samruddhi highway in buldhana vmb 67 ssb