वर्धा : आर्वी मतदारसंघातील निवडणूक काळातील असंख्य घडामोडींपैकी सर्वात महत्वाची घडामोड आज घडली. भाजपचे आमदार दादाराव केचे यांनी पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, मी आता राजकीय संन्यास घेणार. कोणत्याही पक्षात जाणार नाही. सामाजिक कार्य करणार. १९८३ पासून भाजपचे कार्य केले. गावागावात पक्ष उभा केला. संघटना बांधली. २००९ मध्ये आमदार झालो. २०१४ मध्ये पडलो पण राज्यात आमची सत्ता आल्याने आर्वीत खूप विकासकामे केली. २०१९ मध्ये निवडून आलो. गत अडीच वर्षात पुन्हा नव्याने विविध कामे केली. पक्ष मलाच तिकीट देईल, अशी खात्री होती.
पण नाकरण्यात आली. खरे तर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, देवेंद्र फडणवीस म्हणत होते की दादाराव तिकीट तुम्हालाच. उमेदवार सुमित वानखेडे यांनी सहा महिन्यांपूर्वी मला भेटून सांगितले होते की मी नाही तुम्हीच उमेदवार. तरी पक्षाने दिलेल्या उमेदवारासाठी २३ सभा घेतल्या. ठिकठिकाणी फिरलो. मतदान झाले आणि माझ्यावर संशय घेणे सुरू झाले.पक्षातील काही नेते कुजबुज करू लागले. त्यामुळे वाटते की अर्ज मागे नसता घेतला तर बरे झाले असते. आता मला जे कबूल केले होते, ते पण नकोच.विधान परिषद कबूल केली होती. पण काय भरवसा? म्हणून झाले ते झाले. ७१ वर्ष झाले. आता थांबण्याचा निर्णय घेतला, अशी भावना केचे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा…राज्यात गारठा वाढला…मंगळवारपासून पुन्हा तापमानात बदल…
केचे यांनी स्पष्ट आरोप करण्याचे नाकारले. मात्र आता काहीही भाष्य करणार नाही, असे ते लोकसत्ता सोबत बोलतांना म्हणाले. जवळपास ४२ वर्ष आर्वी मतदारसंघात भाजप म्हणजेच केचे हे समीकरण रूढ झाले होते. जिल्हा परिषदेत पक्ष बहुमतात असतांना केचे यांच्या गटास अध्यक्ष व उपाध्यक्ष पद देण्यात आले होते. ते म्हणतील, ती पूर्वदिशा. यातूनच नवा नेता तयार होत नसल्याचे दिसून आल्यावर ज्येष्ठ नेत्यांनी २०१९ च्या निवडणुकीत सुधीर दिवे यांना उमेदवारी देण्याचा डाव मांडला होता. पण केचे यांनी ही एक शेवटची संधी द्या, असे म्हटल्याचे भाजप नेते सांगत. पण, केचे यांनी असे काही बोललो नसल्याचे स्पष्ट करीत दावेदारी कायम ठेवली. ते बाजूला होत नाही म्हणून मग थेट अहमदाबाद येथे अमित शहा यांच्या दरबारात त्यांना हजर करीत अर्ज मागे घेण्याचे फर्मान देण्यात आले. ते मान्य करीत व प्रदेश उपाध्यक्षपद घेऊन केचे यांनी वानखेडे यांचा प्रचार केला. पण, आज अखेर त्यांनी भावनावश होत राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला.