वर्धा : आज खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांप्रती विशेष काळजी घेण्याची सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना केली. बाजारात या हंगामात नकली बियाणे येण्याची शक्यता असते. म्हणून खरेदी केलेल्या बियाणे खरेदीच्या पावत्या शेतकऱ्यांनी जपून ठेवाव्या. तशी माहिती शेतकऱ्यांना द्या. बियाणे नकली आढळून आल्यास थेट फौजदारी कारवाई करण्याची सूचना त्यांनी सभेत दिली.
पांधन रस्त्याच्या कामाबाबत त्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. गतवर्षीपेक्षा आता चांगले काम झाले पाहिजे. पुढील बैठकीत मी आढावा घेणार, अशी तंबीही त्यांनी दिली. हिंगणघाट येथे वैद्यकीय महाविद्यालय देण्याबाबत मागणी होत असल्याचे निदर्शनास आणल्यावर फडणवीस म्हणाले की असा प्रस्ताव आमदार कुणावार यांनी दिला. त्यात काय मार्ग काढता येईल हे बघावे लागेल.
हेही वाचा – अकोला : ..तर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका; १ जूननंतरच कपाशी बियाणे विक्री होणार
सभागृहात वीज तोडल्या जात असल्याची बाब उपस्थित झाली. एका डीपीवरील पंधरा जोडणी असलेल्यापैकी पाचजण बिल भरत नसतील तरी सर्वांचाच वीज पुरवठा तोडल्या जातो. अशी तक्रार आमदार रणजीत कांबळे यांनी केल्यावर त्यात लक्ष घालण्याची सूचना फडणवीस यांनी संबंधित अधिकारी वर्गास केली. बियाणे कमी पडणार नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.