नागपूर : पाश्चिमात्य देशांनी भारताच्या आधीच लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केला. मात्र, असे असतानाही तेथील कृष्णवर्णीय लोकांना आणि विशेषत: महिलांना आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी लढा द्यावा लागला. परंतु, भारत हा जगातील पहिला असा देश आहे की, ज्याने लोकशाही स्वीकारल्याच्या पहिल्या दिवसापासून लिंग, पंथ किंवा वंशाच्या आधारावर कुठलाही भेदभाव केला नाही. आज देशात इतके सुंदर संविधान असूनही लोक धर्माच्या आधारे त्यांचे हक्क मागतात. याउलट त्यांनी संविधानात तरतूद करण्यात आलेल्या आपल्या हक्कांच्या आधारावर आवाज उठवायला हवा, असे आवाहन केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केले.
पद्मभूषण मौलाना अब्दुल करीब पारेख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि मानवता चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्राच्या प्रगतीसाठी विविध धार्मिक समुदायांमध्ये शांतता आणि सद्भावना आवश्यक’ या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, ह्युमॅनिटी चॅरिटेबल ट्रस्टचे माजीद पारेख, इस्मालिक अभ्यासक फैज-उर-रहमान, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे उपस्थित होते.
प्राचीन ग्रंथांचा दाखला देत राज्यपाल खान म्हणाले की, आपला देश कर्मावर आणि त्याच्या परिणामांवर खूप विश्वास ठेवणारा आहे. आपण जे कर्म केले त्याचे परिणाम सहन करावे लागतील. विशेषतः जेव्हा तुम्ही उच्च पदावर असता तेव्हा तुम्हाला अधिक जबाबदारीने वागावे लागते. ही वस्तूस्थिती समजून आपण आपले आचरण ठेवावे. डॉ. हिवसे यांनी आभार मानले.
हेही वाचा : नागपूर : ‘आनंदाचा शिधा’ : कुठे वाटप कुठे प्रतीक्षा, शिधापत्रिकाधारकांच्या पदरी निराशा
देशात धर्माचा वापर स्वार्थासाठी
राज्यपाल खान म्हणाले की, कुठल्याही धर्माच्या धार्मिक ग्रंथाचा अभ्यास केला असता सर्व मानव प्राणी एक असून सर्वांनी एकतेने राहावे असाच संदेश दिला आहे. परंतु, या धर्मग्रंथांचा संदेशही अद्याप आपल्याला समजला नाही. त्यामुळे प्रत्येकदा धर्माचा अर्थ आणि आपल्या परंपरांवर मार्गदर्शन करत राहावे लागते. आपल्या देशात धर्माचा वापर हा प्रत्येकजण स्वत:च्या स्वार्थासाठी करताना दिसतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. यासंदर्भात उदाहरण देताना खान म्हणाले की, चाकूचा वापर हा गृहिणी भाजी कापण्यासाठी करेल तर चोर त्याच चाकूचा गैरवापर करेल. यात चाकूचा गुणधर्म हा चुकीचा नाही तर वापर करणाऱ्याचा आहे. त्यामुळे तुम्ही धर्माचा वापर कसा करता याला अधिक महत्त्व आहे, असेही ते म्हणाले.