बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार आज रविवारी होत आहे. यात जिल्ह्यातील एका भाजप आमदाराची वर्णी लागणार आणि आमदार संजय कुटे हे चर्चेत आघाडीवर असल्याचे वृत्त होते. मात्र त्यांच्याऐवजी खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांना काहीशा अनपेक्षितरित्या लाल दिवा मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांना आज दस्तुरखुद्द ‘देवा भाऊंचा’ फोन आला आणि त्यांनी मंत्रिपदाची ‘गुड न्यूज’ दिली! यामुळे खामगावमधील पदाधिकारी आणि फुंडकरांचे समर्थक, चाहते आज रविवारी, १५ डिसेंबर रोजी सकाळी नागपूरकडे रवाना झाले आहेत.
हेही वाचा – ‘विजेता तू.. देवाभाऊ.. चल पुढे’; मुख्यमंत्री फडणवीस यांचे नागपुरात जल्लोषात स्वागत
मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेल्या भाजपच्या आमदारांना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोन करणार हे काल परवा स्पष्ट करण्यात आले होते. त्याप्रमाणे आमदार फुंडकर यांना आज रविवारी १० वाजेच्या आसपास मुख्यमंत्र्यांचा फोन आला असून त्यांना ही शुभवार्ता देण्यात आली. आमदार फुंडकर निकटवर्तीय पदाधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली.
भाजयुमो ते मंत्री
दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते तथा भाजपला बहुजन चेहरा प्रदान करण्यात अग्रेसर नेते अशी ओळख असलेले पांडुरंग फुंडकर यांचे सुपुत्र आमदार आकाश फुंडकर यांची प्रारंभिक ओळख. राजकारण आणि समाजकारण यांचे बाळकडू घरातच मिळालेले आकाश फुंडकर हे संघाचे द्वितीय वर्ग प्रशिक्षित असून ते सन २००२-०३ मध्ये अभाविपचे खामगाव नगरमंत्री होते. भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष म्हणून २००३-०४ त्यांनी जबाबदारी सांभाळली असून सार्वजनिक क्षेत्रात प्रवेश केला. नंतर ते भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष होते.
हेही वाचा – २३५ कोटी शासनाकडे अडकले; गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादकांची कोंडी
आणि आमदारकी…
दरम्यान २०१४ मध्ये भाजपने संधी दिल्यावर ते खामगावचे आमदार झाले. काँग्रेसचे आमदार दिलीप सानंदा यांना पराभूत करून ते ‘जायंट किलर’ ठरले. यानंतर २०१९ आणि २०२४ मध्ये विजयी होऊन त्यांनी यंदा आमदारकीची हॅटट्रिक केली. पक्षाचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेल्या या युवा नेत्याने यंदाही मंत्रिपदासाठी ‘लॉबिंग’ करण्याचे टाळले. दीर्घ प्रतिक्षेनंतर त्यांना मंत्रिपद मिळाले आहे.
संजय कुटे यांना मोठी संधी…
दरम्यान मंत्रिपदासाठी जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांचे नाव आघाडीवर असताना ते मागे पडले. मात्र त्यांचा ‘पत्ता कट’ झाला नसून त्यांना मोठे पद मिळणार असल्याचे वृत्त आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी आमदार कुटे यांचे नाव आघाडीवर असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत कुटे यांचे नावही चर्चेत आले आहे.