नागपूर : तलावांवर होणाऱ्या अतिक्रमणाने स्थलांतरित पक्ष्यांचा श्वास कोंडला जात असून शिकारीला देखील त्यांना बळी पडावे लागत आहे. बार हेडेड गीज या पक्ष्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या खापरी तलावाचे अस्तित्व आता याच अतिक्रमणाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तलावालगत शेतीच नाही तर त्याठिकाणी घालण्यात आलेल्या कुंपणाने वीजप्रवाहाचा धोकादेखील वाढला आहे.
दहा वर्षांपूर्वी हा तलाव अर्ध्याहून अधिक भरलेला असायचा. बार हेडेड गीज, रेड क्रेस्टेड, क्रेन या स्थलांतरित पक्ष्यांमुळे या तलावाला ओळख मिळाली. पक्षी निरीक्षक आणि अभ्यासकांसाठी देखील हा तलाव अतिशय महत्त्वाचा होता. त्याच्या आजूबाजूला जंगल असून ते वनविकास महामंडळाच्या अखत्यारित आहे. त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांसोबतच काळवीट, सांबर यासारखे प्राणी देखील पाणी पिण्यासाठी येत होते. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. तलावापर्यंत शेती आल्यामुळे तलावाची स्थिती दयनीय आहे. शेतीला तारांचे कुंपण घातले गेल्याने शेतीच्या संरक्षणासाठी वीजप्रवाहाची शक्यता नाकारता येत नाही. ही शक्यता खरी ठरल्यास पक्ष्यांसोबत प्राण्यांच्या मृत्यूला देखील आमंत्रण आहे. शेतामुळे आधीच याठिकाणी येणाऱ्या पक्ष्यांची संख्या रोडावली आहे. याठिकाणी शिकारीची शक्यताही नाकारता येत नाही. शहरातील पक्षीवैभव या तलावावर येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांमुळे थोडेफार शिल्लक राहिले होते. पक्षीच नाही तर प्राणीसुद्धा येऊ नये अशी स्थिती आहे.
पारडगावचा तलाव देखील सुन्न पडला आहे. या तलावाजवळ असलेल्या प्रकल्पामुळे येथील पक्षीवैभव नाहीसे झाले आहे. सायकीचा तलाव थोडाफार वाचलेला असून त्याठिकाणी बार हेडेड गीजचे अस्तित्व बऱ्यापैकी टिकून आहे. या तलावांवर शेतीसाठी परवानगी जरी दिली असेल तरीही शेतकऱ्यांनी पक्ष्यांच्या संवर्धनाची जबाबदारी उचलायला हवी. मात्र, येथे चित्र वेगळेच आहे. काही तलावांवर हे पक्षी उडवून लावले जातात. आता तारांचे कुंपण लावल्यामुळे वीजप्रवाहाचा सर्वात मोठा धोका आहे.
वनविकास महामंडळाने तरी या क्षेत्राकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा पक्षी निरीक्षक व अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.