लोकसत्ता टीम
बुलढाणा: कृषिप्रधान जिल्ह्यातील खरीप हंगामाची नजर पैसेवारी जाहीर झाली असून ती धोक्याचा इशारा देणारी आहे. सोयाबीनसह अन्य पिकांच्या एकरी उत्पादनात लक्षणीय घट येण्याची चिन्हे ‘नजर’मध्ये आली आहे.
जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी नजर अंदाज पैसेवारी जाहीर केली आहे. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ६०( पैसे) इतकी निघाली असून ती चिंताजनक ठरावी अशीच आहे. यातही मलकापूर ५४ पैसे , देऊळगाव राजा ५५, मोताळा ५६, नांदुरा ५८, खामगाव ५६, जळगाव ५५ या तालुक्यातील पैसेवारी गंभीर आहे. बुलढाणा ६९ पैसे , चिखली ६०, मेहकर ६१, लोणार ६०, सिंदखेडराजा ६५, शेगाव ६०, संग्रामपूर ६६ मधील प्राथमिक पैसेवारी फारशी समाधानकारक नाहीये!
आणखी वाचा-विविध घटनांत तिघांचा बुडून मृत्यू, यवतमाळ जिल्ह्यातील घटना
पिकांची बिकट स्थिती
जिल्ह्यात ७.४० लाख हेक्टरवर खरीपचा पेरा झाला होता. यामध्ये सुमारे पावणेचार हेक्टरवर सोयाबिन तर पावणे दोन लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीचा पेरा झाला होता. मात्र या मुख्य पिकांच्या एकरी उत्पादनात लक्षणीय घट येण्याची शक्यता शासकीय अकडेवारीतूनही (पैसेवारीतुनही) स्पष्ट झाली आहे. सोयाबिन ची पैसेवारी ६०, कपाशीची ५४ तर मक्याची ५८ पैसे अशी निघाली आहे.