नागपूर : शहराचा खासदार म्हणून मागील दहा वर्षात शहरात एक लाख कोटींची विकासकामे करण्यात आली. यात उड्डाणपूल, सिमेंट रस्ता यासह अनेक गोष्टी तयार करण्यात आला. मागील दहा वर्षात नागपूरचा विकास अतिशय वेगाने झाला आहे. मात्र हा संपूर्ण विकास नाही, असे मत खुद्द या विकासाचे प्रणेते समजले जाणारे नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.

काय म्हणाले गडकरी?

भौतिक विकास म्हणजेच संपूर्ण विकास होत नाही. शहराचा भौतिक विकास साधतानाच सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात शहर मागे राहू नये यासाठी खासदार सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवाची सुरुवात केली. खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून शहरातील खेळाडूंना एक व्यासपीठ मिळत असल्याची भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

खासदार क्रीडा महोत्सवाच्या सातव्या पर्वाचे रविवारी यशवंत स्टेडियम येथे गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांची उपस्थिती होती. खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून शहरातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळत आहे. शहरासाठी अभिमानाची बाब आहे. या वर्षी अनेक खेळांचे विदर्भस्तरीय आयोजन केले जात आहे. पुढील काळात जास्तीत जास्त भागातील खेळाडूंना सहभागी होता येईल, यादृष्टीने खेळांचे नियोजन करण्यात येणार असल्याचे गडकरींनी सांगितले.

हेही वाचा – नागपूर : ‘थ्री इडियट’ फेम सोनम वांगचुक म्हणाले, “विकास करतोय याचा अहंकार नको…”

नागपूर, विदर्भ आणि महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात खासदार क्रीडा महोत्सव एक उत्तम उदाहरण ठरले आहे. या महोत्सवाच्या यशाचे खरे श्रेय हे दरवर्षी खासदार क्रीडा महोत्सवात सहभागी होऊन मनलावून खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे आहे. शहरातील खेळाडू हेच खासदार क्रीडा महोत्सवाच्या यशाचे शिलेदार आहेत, असेही गडकरी यांनी सांगितले.

उद्घाटन समारंभापूर्वी झालेल्या मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात राजन यादव व महिला गटात प्राजक्ता गोडबोले यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. पुरुष गटात पीडब्ल्यूएस महाविद्यालयाच्या राजन यादवने २३.२४ मिनिटात १० किमी अंतर पूर्ण करत विजय मिळविला. महिलांमध्ये मावडे क्लबच्या प्राजक्ता गोडबोले ने १८.४४ मिनिटांमध्ये ५ किमी अंतर पूर्ण करुन पहिले स्थान पटकाविले. आंतरराष्ट्रीय ॲथलिट देव चौधरी यांनी खासदार क्रीडा महोत्सवाचे ध्वजारोहण केले. ॲथलिट नेहा ढबाले व प्राची गोडबोले या महोत्सवाची मशाल प्रज्वलित केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पीयूष आंबूलकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन आरजे आमोद यांनी केले. आभार डॉ. पद्माकर चारमोडे यांनी मानले.

हेही वाचा – अभिनेता गजेंद्र चौहान म्हणतात, “नागपूरने महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिला, आगामी काळात पंतप्रधान…”

ग्रामीण भागातही आयोजन व्हावे

खासदार क्रीडा महोत्सव हा इतर शहरांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत कंगना रणौत यांनी यावेळी व्यक्त केले. मोठ्या शहरांप्रमाणे छोट्या छोट्या गावांमध्येही असे महोत्सव आयोजित व्हावेत, ज्यामुळे जास्तीत जास्त नागरिक खेळाप्रती सचेत होतील. आज फिटनेसची प्रत्येकालाच काळजी होत आहे. अशा स्थितीत असे महोत्सव हे इतरांना खेळाप्रती प्रेरित करतील, असेही रणौत यांनी सांगितले.

Story img Loader