अनैतिक संबंधातून प्रियकराकडून ३० लाख रुपयांची खंडणी उकळण्यासाठी प्रेयसीने पहिल्या पतीच्या माध्यमातून अपहरण केले. प्रियकराच्या पत्नीला ३० लाखांची खंडणी मागितली. मात्र, पोलिसांनी या अपहरण नाट्याचा छडा लावला आणि सूत्रधार असलेली प्रेयसी रिनाला अटक केली. तीनही आरोपींना तीन दिवस बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी प्रेयसी रिना ही जरीपटक्यातील एका शाळेत शिक्षिका होती. त्यादरम्यान शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप मोतिरामानी यांच्याशी सूत जुळले. दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाल्याची चर्चा आहे. विविहित असलेल्या रिनाच्या पतीला दोघांच्या प्रेमसंबंधाबाबत कुणकुण लागली. त्यामुळे दोघांत वाद होऊन दोघांनी घटस्फोट घेतला. काही वर्षांनंतर रिना गोव्याला गेली. तेथे तिने इव्हेेंट मॅनेजमेंटमध्ये काम केले. तेथे तिला झगमग जीवन जगण्याची सवय लागली. गेल्यावर्षी तिच्या वडिलाचे निधन झाल्यामुळे ती नागपुरात आली. तिने प्रियकर प्रदीप याची भेट घेतली. काही पैसे उकळून ती अन्य दुसऱ्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होता.

हेही वाचा : नागपूर : ओबीसींच्या परदेशी शिष्यवृत्तीला विलंब ; विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

यादरम्यान रिनाने प्रियकराचे अपहरण करून ३० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा कट रचला. या कटात किमान तिघांची तिला गरज होती. त्यामुळे तिने पहिला पती नोवेल ऊर्फ सन्नू हँड्रिक (४३), सूरज धनराज फालके (२२) रा. कळमेश्वर आणि जॉय या तिघांना सामावून घेतले. रिनाने प्रदीप यांना फोन करून एलेक्सिस हॉस्पिटलजवळ बोलावले. तिने कारमध्ये बसण्यास सांगितले. त्यांना थेट मानकापुरातील फ्लॅटमध्ये नेऊन बांधून ठेवले. त्यांच्या पत्नीला ३० लाख रुपयांची खंडणी मागितली.अपहरण केल्यानंतर ३० लाख रुपयांपैकी १५ लाख रुपये पहिला पती नोवेल व त्याच्या साथीदाराला देणार होती. जॉय याच्याकडे खंडणीचे पैसे आणण्याची जबाबदारी होती.

हेही वाचा : “अरे सडक्या मेंदूच्या राज्यकर्त्यांनो, तुम्ही गोधडी भिजवत होता…,” ‘सामना’तून भाजपावर जोरदार टीका, म्हणाले “मेल्या आईचं दूध प्यायलेलो नाही”

रिनाला अटक करताच जॉयने शहरातून पळ काढला. त्याचा शोध जरीपटका पोलीस करीत असून त्याला मध्यप्रदेशातून अटक करण्यात येणार असल्याची माहिती आहे.गेल्या दोन वर्षांपूर्वी रिनाची ओळख नागपूर पोलीस दलात क्युआरटीचा जवान आशीष याच्याशी झाली होती. तिने त्याला जाळ्यात ओढून मैत्री वाढवली. त्याचे लग्न ठरताच त्याची पोलिसात तक्रार केली. आशिषला पैशाची मागणी करण्यात आली होती, त्याने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे रिनाने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची चर्चा आहे.