एका शाळेच्या विवाहित मुख्याध्यापकाचे त्याच्या प्रेयसीने अपहरण करून कुटुंबीयांना ३० लाखांची खंडणी मागितल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. विशेष म्हणजे, झगमगते आयुष्य जगण्यासाठी पूर्वाश्रमीच्या नवऱ्याच्या मदतीनेच रिना नावाच्या प्रेयसीने हा कट रचल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे. नोवेल उर्फ सन्नू हँड्रिक (४३) आणि सूरज धनराज फालके (२२) रा. कळमेश्वर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. जॉय नावाचा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. प्रदीप मोतिरामानी (४६) रा. कृष्णानी चौक, जरीपटका असे अपहृत मुख्याध्यापकाचे नाव आहे. ते महात्मा गांधी शाळेत मुख्याध्यापक आहेत. पोलिसांनी त्यांची पत्नी ज्योतीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.
हेही वाचा : परतीच्या पावसाने विदर्भाला झोडपले ; हवामान खात्याच्या अंदाजाचे पुन्हा धिंडवडे
फिरायला निघाले आणि बेपत्ता झाले
रिना पूर्वी महात्मा गांधी शाळेत शिक्षिका होती. या दरम्यान रिनाने प्रदीपशी मैत्री वाढवून त्यांना जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. सध्या ती दुसऱ्या शाळेत शिक्षिका असून आताही प्रदीपच्या संपर्कात आहे. नोवेलला सोबत घेऊन प्रदीपकडून पैसे उकळण्याची योजना बनविण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास प्रदीप आपल्या घरुन फिरायला निघाले. त्यांना अॅलेक्सिस रुग्णालयाजवळून औषध घ्यायचे होते. या दरम्यान रिनाने त्यांना फोन केला आणि भेटायला आली.
रात्री ९.३० वाजताच्या सुमारास प्रदीपची मुलगी मान्याने फोन केला असता त्यांनी मानकापूर पुलाजवळ असल्याची माहिती दिली होती. मात्र त्यानंतर रात्री उशिरापर्यंतही ते घरी न पोहोचल्याने कुटुंबीय घाबरले. या दरम्यान नोवेल, जॉय आणि सूरजने एका कारमधून प्रदीप यांचे अपहरण केले. त्यांना गणपतीनगर परिसरातील भाड्यात खोलीत रात्रभर दोरीने बांधून ठेवले. प्रदीप यांचा फोन बंद येत असल्याने मोतिरामानी कुटुंबाने मित्र आणि नातेवाईकांना माहिती दिली. प्रदीपचे जवळचे मित्र सोनू जग्यासी यांनाही सांगण्यात आले. रात्रभर प्रदीप यांचा शोध घेण्यात आला.
हेही वाचा : नागपूर : वर्गमित्राकडून विद्यार्थिनी गर्भवती ; बलात्काराचा गुन्हा दाखल
मौद्याला पोहोचून कुटुंबीयांना केला फोन
सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास मान्याच्या मोबाईलवर नोवेलने फोन केला. पोलीस लोकेशन ट्रेस करू शकतात याची माहिती असल्यामुळे त्याने दिशाभूल करण्याच्या उद्देशाने मौदा येथे जाऊन कॉल केला होता. प्रदीपचे अपहरण केल्याचे सांगून दुपारी १२ वाजतापर्यंत ३० लाख रुपयांची व्यवस्थ करा, अन्यथा प्रदीपला ठार मारण्याची धमकी दिली. मान्याने कुटुंबीयांना सांगितले. समाजसेवक सुरेश जग्यासीसह जाऊन नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त अस्वती दोरजे, नवीनचंद्र रेड्डी, डीसीपी सारंग आव्हाड, चिन्मय पंडित सह वरिष्ठ अधिकारी जरीपटका ठाण्यात पोहोचले.
प्रदीपच्या मोबाईलचे लोकेशन मौदा दाखवत होते. कॉल डिटेल्स काढले असता रात्री रिनाशी बोलल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी रिनाला चौकशीसाठी बोलावले. डीसीपी चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात एक पथक मौदासाठी रवाना झाले. प्रदीपच्या मोबाईलचे लोकेशन सतत बदलत होते. आरोपींना पोलीस आपल्या मागे असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे दुपारी ३ वाजताच्या सुमारास प्रदीपला सीएमपीडीआय कॉलनीजवळ सोडून आरोपी फरार झाले. प्रदीप यांनी मित्र सोनूला फोन करून घेण्यास बोलावले. तत्काळ एक पथक घटनास्थळावर पोहोचले. प्रदीप सुखरुप असल्याचे पाहून सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.