नागपूर : विजू मोहोड हत्याकांडातील मुख्य आरोपी असलेल्या धोटे टोळीने गांधीबागेतील मेट्रो रेल्वे स्थानकाचे अधिकारी हर्षल विनायक इंगळे यांचे अपहरण केले. इंगळे यांना पाच लाखांची खंडणी मागितली. मात्र, कोणताही अनर्थ घडण्यापूर्वी गुन्हे शाखेने टोळीला अटक केली. ही खळबळजनक घटना सक्करदरा पोलीस ठाण्याअंतर्गत विताली बारसमोर मध्यरात्री घडली.
प्रशांत ऊर्फ बॉबी धोटे (३३), रा. सक्करदरा, प्रणय चन्ने (३३), रा. नंदनवन आणि मो. वसीम शेख (३२), रा. न्यू नंदनवन असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. स्वप्निल मांडळकर, रा. न्यू नंदनवन याचा शोध सुरू आहे. प्रशांत हा गुन्हेगार असून घर खरेदी, विक्रीचे काम करतो. प्रकाशचे दुचाकी वाहन दुरुस्तीचे गॅरेज आहे. तर बॉबी धोटे हा विजू मोहोड हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे.फिर्यादी हर्षल इंगळे (३८, रमना मारोती, नंदनवन) हे मेट्रो रेल्वेत अधिकारी आहेत. ते गांधीबाग रेल्वेस्थानकाचे प्रभारी पदावर कार्यरत आहेत. हर्षल मध्यरात्री सक्करदऱ्यातील विताली बिअर बारमध्ये होते. काही वेळातच हर्षल घरी जाण्यासाठी निघाले आणि कारमध्ये बसणार त्याच वेळी आरोपी हर्षलजवळ आले. त्यांना बळजबरीने स्वत:च्या कारमध्ये बसवले.
हेही वाचा >>>Somvati Amavasya 2023:आज सोमवती अमावस्या, कशी असते पूजा व महत्व काय?
सोनसाखळी आणि भ्रमणध्वनी हिसकावला तसेच पाच लाखांची खंडणी मागितली. चालत्या कारमध्ये मारहाण सुरू असताना व्हेरायटी चौकात हर्षल यांनी कारमधून उडी घेऊन पळ काढला. भयभीत झालेल्या हर्षलने सक्करदरा पोलीस ठाणे गाठून सारा प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी गुन्हा नोंदवला.अपहरणकर्ते प्रतापनगर पोलीस ठाण्याअंतर्गत जयताळा मार्गावरील डिजो लॉज व हॉटेलमध्ये असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखा युनिट चारचे अविनाश जायभाये यांना मिळाली. त्यांनी आरोपींना पकडून सक्करदरा पोलिसांच्या सुपूर्द केले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, अतुल चाटे, दीपक चोले, संदीप मावलकर, श्रीकांत मारवाडे यांचा समावेश होता.
हेही वाचा >>>बुलढाण्यात कृषिपाठोपाठ वैद्यकीय महाविद्यालयही मार्गी! उच्च शिक्षणाचा अनुशेष दूर, पालक-विद्यार्थ्यांना दिलासा
आरोपींद्वारे केली हर्षल यांची टेहळणी
अपहरणकर्ते हर्षलला ओळखत होते. त्यांनी आधी टेहळणी केली होती. हर्षल यांना चांगला पगार असून त्यांची आर्थिक स्थिती भक्कम असल्याने आरोपींनी हर्षलच्या अपहरणाची योजना आखली. हर्षल बारमध्ये जात असल्याचे पाहून आरोपीसुद्धा त्याच बारमध्ये गेले. हर्षल घरी जाण्यासाठी निघताच आरोपींनी त्याचे अपहरण केले होते.