लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: उपराजधानीतील मेडिकलशी संलग्नित सुपरस्पेशालिटी रुग्णालयात विविध तांत्रिक कारणांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाला थांबा लागला आहे. परंतु, मंगळवारी येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले. यावेळी वडिलांनी मूत्रपिंड दानातून २२ वर्षीय मुलाला जीवनदान दिले, हे विशेष.

‘एम्स’मध्ये नवनवीन विभाग सुरू होत असून बाह्यरुग्ण संख्या दोन हजारांवर गेली आहे. आता येथे गंभीर व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसोबतच मूत्रपिंड प्रत्यारोपण सुरू झाल्याने मध्यभारतातील रुग्णांसाठी ‘एम्स’ आशेचे केंद्र ठरणार आहे. राज्यात शासकीय रुग्णालय असलेल्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात २०१६ मध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण सुरू झाले. तेंव्हापासून तेथे २०२० पर्यंत ६८ रुग्णांचे मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले.

आणखी वाचा-अमरावती : वडिलांनी संतापून मोबाईल फोडला, १५ वर्षीय मुलीने रागाच्या भरात..

राज्यात राजीव गांधी जीवनदायी योजना वा महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून नागपूरच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात पहिली शस्त्रक्रिया नोंदवली गेली. सुपरस्पेशालिटी हे एकच शासकीय रुग्णालय मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी असल्याने येथे रुग्णांची गर्दी वाढली. मात्र, मार्च २०२० पासून करोनाचा प्रादुर्भाव वाढताच येथे प्रत्यारोपणाला थांबा लागला. करोना नियंत्रणात आल्यावर येथे ‘नेफ्रोलॉजी’ विभागाच्या प्रमुखांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांच्या जागेवर ‘नेफ्रोलॉजिस्ट’ची नियुक्ती झाली. परंतु, सहा महिन्यांवर कालावधी होऊनही प्रत्यारोपणाची प्रतीक्षा कायम आहे. याच दरम्यान आरोग्य विभागाकडून ‘एम्स’ला अवयव प्रत्यारोपणाची मंजुरी मिळाली. ‘नेफ्रोलॉजी’ विभागात उपचार घेत असलेल्या २२ वर्षीय युवकाचा वडिलांनी मूत्रपिंड दान करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या रक्त व इतरही चाचण्यांचा अहवाल सकारात्मक येताच पुढील प्रक्रियेला वेग आला. अखेर मंगळवारी प्रसिद्ध किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते यांच्या मार्गदर्शनात ‘एम्स’च्या डॉक्टरांच्या चमूने ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली. ‘एम्स’चे संचालक डॉ. एम. हनुमंत राव व वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी डॉक्टरांचे कौतुक केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kidney transplant now in nagpur aiims too mnb 82 mrj
Show comments