वर्धा : संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेत शालेय विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याचा प्रसार करण्याचे शालेय शिक्षण विभागाने ठरविले आहे.
जगात सर्वाधिक तृणधान्य पिकविणाऱ्या भारतात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कुटकी, राजगिरा आदी पिकांचे वर्गीकरण तृणधान्यात केले आहे. राज्यशासनाने त्यासाठी ‘महाराष्ट्र मिलेट मिशन’ पुरस्कृत केले आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच तृणधान्य व त्यांची पौष्टिकता पटवून देण्यासाठी शालेय विभाग विविध उपक्रम राबविणार. रोजच्या उर्जेसाठी जंकफूड नवे तर तृणधान्य खा, असे पटवून दिले जाणार आहे.
हेही वाचा – गोंदिया जिल्ह्याला मिळणार चार वर्षांत सहावे पालकमंत्री? खातेवाटपानंतर स्पष्ट होणार चित्र
विद्यार्थ्यांच्या आहारात तृणधान्याचा अधिकाधिक समावेश व्हावा म्हणून १ ते १४ ऑगस्ट, १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर तसेच १ ऑक्टोंबर ते १५ ऑक्टोंबर या कालावधीत विविध कार्यक्रम घेण्याची सूचना आहे. कृषीखात्यामार्फत तृणधान्याची माहिती व त्याची उपयुक्तता पटवून देणे. पालकांच्या सहकार्याने तृणधान्याची पाककृती स्पर्धा आयोजित करणे व या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्याचे नियोजित आहे. यासाठी पुरस्कारपण ठवण्यात आले असून त्यासाठी निधी प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेतून मिळणार आहे.