गडचिरोली: जिल्ह्यात वन्यप्राणी आणि मानव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. वाघाचे हल्ले वाढतच असून अहेरी तालुक्यातील कमलापूर गावानजीक वाघाने चक्क चालत्या दुचाकीवर झडप घेत हल्ला केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. नशीब बलवत्तर असल्याने दुचाकीवरील दोघे मित्र या हल्ल्यात थोडक्यात बचावले.
हेही वाचा >>> नागपूर: ‘त्या’ चालकांवर कारवाईबाबत ‘एसटी’ महामंडळ गोंधळलेले!
अहेरी तालुक्यातील रेपनपली आणि कमलापूर परिसरात काही दिवसांपासून वाघाचा वावर असल्याची चर्चा होती. दरम्यान, बुधवारी रात्रीच्या सुमारास सुधीर रंगुवार आपल्या मित्रासह कमलापूर- मोदुमोडगू मार्गावरून दुचाकीने जात असताना झुडपात दडून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर झडप घेतली. यात दुचाकीच्या मागच्या भागाला वाघाचा पंजा लागला. वाघाच्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या दोघा मित्रांनी कसेबसे गाव गाठून आपबिती कथन केली. यप्रकरणी कमलापूर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना वाघाच्या पंज्याचे ठसे आढळून आले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.