पोटात बाळ असल्यापासून ते शाळेत जाईपर्यंत इत्थंभूत कामाची नोंद ठेवणाऱ्या अंगणवाडीसेविकांना निवडणुकीच्या कामाला जुंपल्याने आरोग्याच्या कामाची आबाळ होत आहे. ज्या कामासाठी त्यांची नेमणूक आहे, त्या आरोग्य आणि शालेय शिक्षणाच्या मुख्य कामालाच हरताळ फासला जात आहे.
अंगणवाडीसेविका आणि मदतनीस यांना खऱ्या अर्थाने समाजाचे आरोग्यदूत म्हटले जाते. कारण तळागाळात काम करताना आरोग्याचे जटील प्रश्न सर्वप्रथम त्यांच्यापर्यंत येतात आणि त्यांच्या माध्यमातून समस्यांची सोडवणूक केली जाते. त्यांना थोडी नव्हे तब्बल ३६ ते ४० प्रकारच्या कामांची नोंद ठेवावी लागते. मात्र, त्यांना निवडणुकीच्या कामावर जुंपल्याने आई व बालकाच्या आरोग्याबरोबरच शालेय शिक्षणाच्या मुख्य कामालाच हरताळ फासला जात आहे. शिवाय या अंगणवाडीसेविका आणि मदतनीसांना त्यांच्या कार्यक्षेत्रापासून आठ ते दहा किलोमीटरवर असलेल्या मतदान केंद्रांवर पाठवले जाते. त्यामुळे त्यांचे मुख्य कामाकडे दुर्लक्ष होते. आरोग्य आणि शालेय शिक्षणाचे कामे अपूर्ण असल्याने त्यांची चिडचिड वाढते. त्यांनी निवडणुकीच्या कामासाठी नकार दिल्यास ‘तुमची त्यासाठी नेमणूक झाली असून नावेही वर पाठवण्यात आली असल्याने तुम्हाला त्या ठिकाणी जावेच लागेल’, अशी सक्ती वरिष्ठांकडून केली जाते.
अंगणवाडीसेविकांवर कामाचा ताण मोठा असतो. अनेक प्रकारच्या कामांची नोंद त्यांना ठेवावी लागते. त्यामध्ये सर्वेक्षण, आहारवाटप, आहारचे बिल, गर्भवती माता नोंदणी, बालक व माता वाढ नोंदणी, प्रगती नोंदणी, लसीकरण, आरोग्य तपासणी, जन्म व मृत्यू, अंगणवाडी साहित्य साठा, गृहभेट, संदर्भ सेवा, जन्म-मृत्यू समिती सभा कामकाज, माता समिती सभा कामकाज, अर्धवार्षिक वाढदिवस, औषध वाटप, किशोरवयीन मुलींचे सर्वेक्षण, किशोरवयीन नोंदणी, किशोरवयीन तांदूळ वाटप, किशोरवयीन मुलींचे स्वस्त दुकानदाराने भरावयाचे, कुपोषित मुले, आपली अंगणवाडी समिती, ग्राम आरोग्य पाणी पुरवठा व सत्यता समित्यांचे कॅशबुक, प्रोसेडिंग, हजेरी आणि बिल, असे चार रजिस्टर, महत्त्वाचे परिपत्रक, इतर सभा, पंतप्रधान निधी अंतर्गत ‘फूड’, आहारावर देखरेख समिती, बालक सभा, किशोरी शक्ती, महिला मंडळ, किशोरी बैठक, वृद्धांसाठी मार्गदर्शिका आणि समन्वय समिती. या सर्वच कामांवर अंगणवाडीसेविकांअभावी परिणाम होतो.
यासंदर्भात ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’च्या समन्वयक नसरिन अंसारी म्हणाल्या, पोषण हक्क प्रकल्पांतर्गत पूर्व नागपुरात १४० अंगणवाडी केंद्र आहेत. त्यातील ५१ अंगणवाडी सेविका आणि दोन मदतनीस २०१३पासून निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत आरोग्य, बालकांच्या शिक्षणाचे काम करणे अवघड होऊन बसते. मूळ कामालाच न्याय देता येत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा