नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेसच्या निशान्यावर आहेत तर लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी भाजप नेत्यांना लक्ष्य केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसचे वाभाडे काढताना काँग्रेसच्या घराणेशाहीपासून तर काँग्रेसला शहरी नक्षलींनी घेरल्याचे आरोप केले. तसेच मतांच्या ध्रुवीकरणासाठी ‘एक है तो सेफ है’ अशी घोषणाही दिली. राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना आणि आरक्षण मर्यादा वाढण्यावर सातत्याने भाष्य केले. एवढेच नव्हेतर मोदी आणि उद्योगपती अदानी यांच्या संबधावरून टीका केली. आता संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत प्रवेश केल्यापासून लोकसभेतील चर्चेचा दर्जा घसरल्याची टीका केली. ते नागपुरात निवडणुकीच्या प्रचारासाठी आले आहेत.
हेही वाचा…सत्तेत आल्यास सोयाबीनला ७ हजार रुपये हमीभाव…रणदीप सिंग सुरजेवाला यांची घोषणा…
ते म्हणाले, राहुल गांधी आल्यापासून लोकसभेतील चर्चेचा दर्जा घसरला आहे. आमच्याकडे बोलू शकतील आणि वाद घालू शकतील असे लोक आहेत, पण काँग्रेसकडे कोणीच नाही असे दिसते. ज्यांना वाद घालायचा आहे ते राहुल गांधींना घाबरतात, असे ते म्हणाले. रिजिजू यांनी दावा केला की, काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ खासदारांना संसदेत चर्चा आणि वादविवाद करायचा असतो. परंतु विरोधी पक्षनेत्याला ते नको असते. कारण ते चर्चा करू शकत नाहीत आणि ते केवळ काही स्वयंसेवी संस्थांनी दिलेल्या चिठ्ठ्या संसदेत वाचत असतात, अशी टीका रिजिजू यांनी केली.
रिजिजू यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसचे खासदार व राष्ट्रीय प्रवक्ता रणदीप सिंग सुरजेवाला यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, मोदींनी दहा वर्षे भारतीय संसदेला ओलीस ठेवले होते. त्यांनी संसदेला ओलीस ठेवल्यामुळे संसदेत कोणतीही चर्चा होत नव्हती.
हेही वाचा…“राहुल गांधी अजुनही अपरिपक्व नेते”, संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांची टीका
पण, राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यापासून त्यांनी सरकारला चर्चेला भाग पाडले आणि सर्वच पक्षांचा आवाज ऐकू येऊ लागला. ज्यामुळे किरेन रिजिजू यांच्या पोटात दुखू लागले. परिणामी, ते अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत. विरोधी पक्षनेता जनतेने संसदेला दिला असून शेतकरी, कामगार, महिला, अल्पसंख्याक, दलित, ओबीसी लोकांचे प्रश्न संसदेत मांडले जात आहेत. पुढेही या मुद्यांवरून सरकारला चर्चेसाठी भाग पाडले जाईल. त्यामुळे मोदी सरकारने त्यासाठी सज्ज राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.