अकोला : महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशींना भारतीय बनवण्याच्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे, असा दावा भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज येथे केला. या प्रकरणात आठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून ३०० च्यावर आरोपींची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
उशिरा जन्म व मृत्यू नोंदणी प्रकरणात किरीट सोमय्या यांनी आक्रमक पवित्रा घेतला. अकोला, अमरावती जिल्ह्यात बनावट कागदपत्रांद्वारे जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात आज किरीट सोमय्या यांनी अकोल्यातील रामदासपेठ व पातूर पोलीस ठाण्यात भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. यावेळी किरीट सोमय्या यांनी पोलिसांकडे काही कागदपत्रांचे पुरावे देखील सादर केले आहेत. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. तपासणी केली असता त्यातील बहुतांश अर्ज बोगस आहेत. त्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. आज पोलिसांना काही अतिरिक्त पुरावे दिले आहेत. केवळ आधारकार्डच्या आधारावर जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे. बोगस कागदपत्रांद्वारे जन्म प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांविरोधात महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत आठ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले असून ३०० हून अधिक आरोपींची चौकशी केली जात आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.
महाराष्ट्रातील एक मोठा घोटाळा उघडकीस आला. दोन लाख बांगलादेशींना भारतीय बनवण्याचा पर्दाफाश आम्ही केला आहे. उशिरा नोंदणीचे प्राप्त झालेल्या अर्जांपैकी ९८ टक्के जन्म प्रमाणपत्रासाठी, तर केवळ दोन टक्के मृत्यू प्रमाणपत्राचे आहेत. जन्म प्रमाणपत्रासाठीच्या ९८ टक्क्यांमध्ये एक टक्का सुद्धा हिंदुंचे अर्ज नाहीत. ९७ टक्क्यांपेक्षा अधिक मुस्लिमांचे अर्ज आहेत. त्यांचे वय ३०, ४० ते ७० वर्षांपर्यंतचे आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले.
‘एसआयटी’ मार्फत चौकशी
जन्म, मृत्यू नोंदणी कायदा १९६९ मध्ये सुधारणा करून उशिरा जन्म व मृत्यू नोंदणी संबंधीचे अधिकार हे जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना प्रदान केले होते. कायद्यातील सुधारणेनंतर झालेल्या कार्यवाहीसंदर्भात शासनाला मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानंतर उशिरा प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली. या प्रकरणाची विशेष तपास पथकाच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे.