नागपूर : सोमवार १७ मार्च रोजी नागपुरात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य सूत्रधार फहीम शमीम खान याला अटक केली आहे.

पोलिसांचा दावा आहे की, फहीम खानने यावेळी की चिथावणीखोर वक्तव्यं करत आंदोलनकर्त्यांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केले. त्याच्याच नेतृत्वाखाली जमावाने जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक केली, ज्यात ४० हून अधिक पोलीस जखमी झाले. याशिवाय, एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्नही जमावाने केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आता या प्रकरणात किरीट सोमय्या यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी नागपूर पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहले असून फहीम खान याचा मालेगाव येथील अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याचा दावा करत त्यादिशेने चौकशीची विनंती केली आहे. फहीम शमीम खान हा ३८ वर्षीय स्थानिक राजकीय नेता असून, तो मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमपीडी) या पक्षाचा नागपूर शहर अध्यक्ष आहे.

त्याचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. फहीम खानने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. यात त्याला १०३७ मते मिळाली असून त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.

किरीट सोमय्यांच्या पत्रात नेमके काय?

नागपूर येथे झालेली दंगल भडकवणारा मुख्य सूत्रधार फहीम खान असल्याचे दिसते. फहीम खान याचा मालेगाव येथे काही राजकीय, सामाजिक व मुस्लिम अतिरेकी संघटनेशी संपर्क असल्याचे कळते.

गेल्या ४ महिन्यात मालेगाव येथे २ मोठे घोटाळे उघडकीस आले. मालेगाव येथील सिराज मोहम्मद व मोहम्मद बगाड यांनी ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२४ विधानसभा निवडणुकीच्या काळात वोट जिल्हा फंडिंग घोटाळा घडविला.

२२ कोटी रुपयांचा या घोटाळ्यात महाराष्ट्र पोलीस व प्रवर्तन निर्देशालयाने कारवाई केली आहे. मालेगाव येथे मोठ्या प्रमाणात उशिरा जन्म प्रमाणपत्र घोटाळाही बाहेर आला आहे. शेकडो अपात्र, घुसखोर बांग्लादेशी लोकांनी यात खोटे दस्ताजेव, कागदपत्रे देऊन प्रमाणपत्र मिळवले. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत दोन डझनहून अधिक लोकांची अटक ही झाली आहे. फहीम खान व मालेगावच्या या घोटाळ्याचे राजकीय व अतिरेकी संघटनेशी संबंधीची ही चौकशी करावी. तसेच फहीम खानच्या बांगलादेशी कनेक्शनची ही चौकशी करायला हवी, अशी माझी विनंती आहे.