नागपूर: नागपुरातील काटोल रोड, पोलीस मुख्यालयात हवालदार म्हणून कार्यरत किशोर तिजारेंचा (४५) अपघातामुळे मेंदूमृत झाला. जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्यांच्या अवयवदानातून चार कुटुंबाना मोठा आधार दिला.
अवयवदान करणारे किशोर तिजारे यांच्या पत्नीचे नाव सपना आहे. त्यांना खुशी (१२), हिमांशी (१०), मितांश (७) असे तिन मुले आहेत. ८ ऑगस्टला किशोर तिजारे हे कार्यालयाच्या काही कामासाठी गिट्टीखदान चौकातून संध्याकाळी ७.३० वाजता दुचाकीवर जात होते. रस्त्यात त्यांचा अपघात झाला. अपघातात मेंदूला गंभीर मार लागल्याने त्यांना तातडीने न्यू ईरा रुग्णालयात दाखल केले गेले.
डॉक्टरांनी किशोर यांच्यावर उपचार सुरू केले. उपचाराला योग्य प्रतिसाद नसल्याने त्यांच्या काही वैद्यकीय तपासणी केल्या असता त्यांचा मेंदूमृत असल्याचे पुढे आले. तातडीने ही माहिती तिजारे यांच्या कुटुंबयांसह विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीलाही दिली गेली. न्यू ईरा रुग्णालयातील डॉक्टरांसह विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीकडून अवयवदानाबाबत समुपदेशन केले गेले. कुटुंबीयांनी संमती दर्शवताच या रुग्णाच्या अवयवांशी गुणसूत्र जुडणाऱ्या रुग्णाचा शोध सुरू झाला. शेवटी गुरुवारी (१० ऑगस्ट) एक मूत्रपिंड ४७ वर्षीय न्यू ईरा रुग्णालयातील प्रतीक्षा यादीतील रुग्ण दुसरा मूत्रपिंड ३० वर्षीय केअर रुग्णालयातील रुग्णामध्ये प्रत्यारोपित केले गेले. तर दोन्ही बुब्बुळ महात्मे आय बँकेला दिले गेले. त्यामुळे पुढे या बुब्बुळाचे दोन रुग्णात प्रत्यारोपण होऊन तेही हे सुंदर जग बघू शकणार आहे. परंतु तांत्रिक कारणाने यकृत इतरत्र पाठवता आले नसल्याने त्याचे प्रत्यारोपण होऊ शकले नाही.