यवतमाळ : शिवसेना उबाठाच्या प्रवक्तेपदावरून शेतकरी नेते, आंदोलक किशोर तिवारी यांना बुधवारी रात्री पक्षाने अचानक काढून टाकले. ही गच्छंती होण्यामागे एका खासगी दूरचित्रवाहिनीच्या कार्यक्रमात किशोर तिवारी यांनी पक्षातील संघटनात्मक त्रुटींवर बोट ठेवल्याचे कारण असल्याची चर्चा आहे.या गच्छंतीनंतर किशोर तिवारी यांनी आज गुरूवारी दुपारी एक चित्रफित प्रसारित करून खदखद व्यक्त केली. राजकीय पक्ष आंदोलक कार्यकर्त्यांचा ‘टॉयलेट पेपर’प्रमाणे वापर करतात, अशी उद्विग्नता तिवारी यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी किशोर तिवारी यांना प्रवक्ते पदावरून पदमुक्त केले, असे प्रसिद्धी पत्रक विनायक राऊत यांच्या सहीने शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून काढण्यात आले आहे.

किशोर तिवारी यांनी या पदमुक्तेबाबत विचार मांडताना चित्रफितीतून ठाकरे कुटुंबीय, शिवसेना उबाठा पक्षातील अन्य नेत्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. बुधवारी रात्री एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात विश्लेषण करताना किशोर तिवारी यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे संघटन कमजोर करणारे पक्षातील लोकं कोण, या लोकांनी पक्षात एकाधिकारशाही निर्माण केली आहे, जनसामान्यांशी संपर्क तुटला आहे, मोठ्या प्रमाणात संवादहिनता निर्माण झाली. त्यामुळे चांगले कार्यकर्ते झपाट्याने पक्ष सोडून जात आहे, या आशयाचे विश्लेषण केले होते.

या विश्लेषणाच्या १५ मिनिटानंतरच प्रवक्तेपदावरून पदमुक्त करण्यात आल्याने किशोर तिवारी यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या कारवाईबाबत आपल्याला खंत वाटत नाही, मात्र पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे एकाकी असताना आपणच त्यांची व पक्षाची बाजू माध्यमांमधून जोरकसपणे मांडली. अभिनेता सुशांत सिंग आणि दिशा सालयानी प्रकरणात अनेकांनी शेपूट घातले असताना, आपण सर्वांना हे प्रकरण कसे खोटे आहे, हे सर्व पॅनलवरील लोकांना समजून सांगत ही फाईल बंद होईपर्यंत सातत्याने ठाकरे कुटुंबियांची बाजू मांडली, असे तिवारी यांनी म्हटले आहे.

सार्वजनिक पदावर असताना कंत्राटं घेण्याचा संबंध काय? राजकीय जीवनात पारदर्शकता महत्वाची असते. हे समजत नसेल तर राजकीय जीवनात राहण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही, हे बोलणारा माणूस पक्षात आहे. परंतु, त्याच्याकडून तुम्हाला सत्य ऐकायचे नाही. जे लोकं लाळघोटे आहेत, जे लोकं तिकीट वाटप करताना पैसे गोळा करतात अशा तक्रारी आहेत, असेच लोक पक्षाला हवे आहेत, अशी टीका तिवारी यांनी केली आहे.
पक्षाची साफसफाई करण्याची सुरूवात उद्धव ठाकरे यांनी घरापासून करायला हवी, असा सल्लाही तिवारी यांनी दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी पक्ष पुढे न्यायचा असेल तर उद्धव ठाकरे यांनी आधी मुलगा, पत्नी, तसेच पक्षाला विकरणारे, भ्रष्ट व लाळघोटे यांची पक्षातील ढवळाढवळ बंद करावी, असा सल्ला दिला आहे.

आजच्या इतकी लाचार दिशाहीन शिवसेना कधी पाहिली नाही, असेही तिवारी यांनी म्हटले आहे. खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी शरसंधान साधले आहे. पदमुक्त केले, पक्षातून हकालपट्टीची वाट पाहत आहो, असे सांगत आता गप्प बसणार नाही, जे दिसले ते बोलणार असा इशाराही तिवारी यांनी दिला आहे.

Story img Loader