नागपूर : आम्ही पक्षाच्या मुळाशी जाऊन काम करतो. आम्हाला रश्मीताईंकडून कानमंत्राची गरज नाही. जी जबाबदारी दिली ती पूर्ण क्षमतेने पार पाडतो, त्यातून चांगले काहीतरी करण्यासाठीच स्त्री शक्तीचा आमचा संवाद आहे, असे मुंबईच्या माजी महापौर आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून महिला आघाडीच्या स्त्रीशक्ती संवाद यात्रेला मंगळवारी नागपुरातून सुरुवात झाली होती. बुधवारी किशोरी पेडणेकर नागपुरात पत्रकारांशी बोलतांना म्हणाल्या, यात्रेनिमित्त ज्या महिला पक्षाला वेळ देतात. त्या पक्षाच्या दर्जा सुधारतो. आम्हीही याच अनुषंगाने काम करतो. पक्ष फुटीनंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते. ती धुळवड कमी झाली. त्यामुळे आम्ही विदर्भाचा दौरा सुरू केला.
स्त्रीशक्ती संवाद यात्रेसाठी रामटेक विधानसभा सावनेर, काटोल आणि नागपूर या विधानसभेत महिलांशी संवाद साधून प्रश्न समजून घेणार आहे. संवादाला आलो असलो तरी ताकाला जाऊन भांड लपवणार नाही. पक्षाचे अधिकारी पदाधिकारी हे त्या पक्षाचे शस्त्र असतात. त्यांचा उपयोग शस्त्र म्हणून केला जातो. त्यांच्याकडून राजकीय स्थितीही जाणून घेतली जाईल. रामटेकची उमेदवारी कोणाला मिळणार यापेक्षा कोणता उमेदवार किती उजवा आणि डावा आहे हे लोकांना समजावून सांगणे जास्त गरजेचे असल्याचेही पेडणीकर म्हणाले.
आघाडीत कुणाला कोणती जागा सांगता येत नाही
महाविकास आघाडीमध्ये आता समीकरण काय तयार होत आहे, याची कल्पना आम्हाला नाही. पण सत्तेत आघाडीच येणार आहे. जागेबाबतच्या वाटाघाटीनंतर परत एकदा विदर्भाचा दौरा आहे. आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळेल हे आताच म्हणणे योग्य नाही. जो काही विचार आहे पक्षप्रमुख म्हणून आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेणार असल्याचेही पेडणेकर म्हणाल्या. सिने पुरस्कार सोहळा आम्ही काही बघत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई कशी खालसा होत आहे, ते बघतो, असा टोला पेडणेकर यांनी सरकाला लगावला.
हेही वाचा…नागपूर : धावत्या गाडीत चिमुकलीशी अश्लील चाळे, कोच अटेंडेंटला प्रवाशांनी चोपले
आम्हाला वाटेल तेव्हा अयोध्येला जाऊ
‘श्री राम’कडे बघतांना आपण हिंदू आहोत. आपल्या सगळ्यांचे दैवत राम आहे. योगा करतांना पहिले श्वासात राम असल्याचे शिकवले जाते. आमंत्रण देऊन कुणाला तरी वर चढवायचे, कुणाचा अपमान करायच, त्याच्यावरती आपण अधिक न बोलता जेव्हा वाटेल तेव्हा अयोध्येला जाणार. आमच्या पक्षप्रमुखांनी काळाराम मंदिरातील कार्यक्रम एक महिन्यापूर्वीच ठरवला होता. त्यामुळे आम्ही सगळे नाशिकला जाणार आहोत . नाशिक साक्षात प्रभूंचीच भूमी आहे. पंचवटी तिला म्हटले जाते. वनवासात असताना येथे प्रभू रामाचा वास होता, याकडे पेडणेकर यांनी लक्ष वेधले.