गोंदिया : शासनातर्फे शासकीय रेशन दुकानांद्वारे शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदूळ व इतर धान्याचा पुरवठा केला जातो. मात्र, जुलै महिन्यात लाभार्थ्यांना गहूऐवजी मका वितरित केला जात आहे. शासनाने गव्हाचा पुरवठा निम्मा करून त्यात मक्याचा समावेश केला आहे. येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत रेशन दुकानातून लाभार्थ्यांना मका वितरित करण्यात येणार आहे. दुसरीकडे, तांदळाच्या पुरवठ्यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही.
विदर्भात गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मका पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली असून उत्पादनही चांगले झाले आहे. त्यामुळे शासनाने पुरवठा अधिकाऱ्यांना मका पीक खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात मक्याचे उत्पादन घेतले. परिणामी, शासनाच्या नियमाप्रमाणे ज्या भागात शेतकरी ज्या भरड धान्याचे उत्पादन अधिक घेतात. त्या भागातील भरड धान्य रेशनच्या माध्यमातून नागरिकांना विक्री करण्याचे निर्देश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना रेशन दुकानातून मका वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जुलै महिन्यात गव्हाच्या ऐवजी मका वाटप करण्यात येत आहे.
हेही वाचा >>>बुलढाणा: मलकापुरात निसर्ग कोपला! ‘कोसळधार’मुळे शेती पाण्यात, घरांमध्ये शिरले पाणी
यापूर्वी ही खरेदी भारतीय अन्न महामंडळ करत होती. गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या शासकीय रेशन दुकानातून लाभार्थ्यांना गहू वाटप करण्यात येत आहे. मात्र, आता अचानक मका वितरीत केला जात असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे. शासनाच्या निकषानुसार, अंत्योदय लाभार्थ्यांना यापूर्वी रेशन दुकानातून २५ किलो तांदूळ व १० किलो गहू असा ३५ किलो रेशनचा पुरवठा करण्यात येत होता. दरम्यान, आता मका उत्पादनाने १० किलो गव्हाऐवजी आता ५ किलो गहू व ५ किलो मका शिधापत्रिकाधारकांना देण्यात येईल. तांदळाच्या पुरवठ्यात बदल करण्यात आला नसून २५ किलो तांदूळ लाभार्थ्यांना मिळणार आहे.
शासनाच्या निर्देशानुसारच वितरण
रेशन दुकानातून लाभार्थ्यांना तांदूळ व गहूचे वाटप करण्यात येत होते. आता मका दिला जात आहे. यासाठी गव्हाच्या वाटपात कपात केली असून निम्मे गहू व निम्मे मक्याचे वितरण जुलै महिन्यापासून सुरू झाले आहे. शासनाच्या सूचनेनुसार मका वाटप सुरू असून डिसेंबर महिन्यापर्यंत ते कायम राहील, अशी शक्यता आहे.- समीर मिर्झा, गोदाम व्यवस्थापक, गोरेगाव
हेही वाचा >>>तलाठी भरती अर्जात चक्क आईचे नाव बदलण्याचा गैरप्रकार, कारवाईचा इशारा
कारण काय?
विदर्भ आणि महाराष्ट्रातील इतर भागातील शेतकरी हे गव्हाच्या तुलनेत मका पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात करतात. विशेष म्हणजे, मका पिकाच्या पेरणीसाठी खर्च कमी आणि उत्पादन अधिक मिळण्याची हमी आहे. जास्त भाव मिळाल्याने शेतकरी गव्हाऐवजी मका पेरत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मक्याची पेरणी करत असल्याने उत्पादन वाढले आहे. त्यामुळे गव्हाचा तुटवडा निर्माण झाला असून राज्य सरकारने रेशन दुकानांमध्ये मका वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.