अकोला : आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेत गरजूंना पाच लाख रुपयांपर्यंत विनामूल्य उपचाराचा लाभ मिळतो. जिल्ह्यात आरोग्य केंद्रे, सामाईक सुविधा केंद्रांच्या ठिकाणी आयुष्मान कार्ड वितरित करण्यात येत आहेत. आतापर्यंत ३.४० लाख लाभार्थ्यांना कार्डचे वितरण करण्यात आले.
केंद्र शासनाची आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजना राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेसह राबवली जात आहे. या योजनेत एक हजार ३५९ गंभीर आजारांवर पाच लाख रुपयांपर्यंतची शस्त्रक्रिया व उपचार अंगीकृत शासकीय आणि खासगी रुग्णालयातून पूर्णतः विनामूल्य केले जातात. आरोग्य विमा कवच प्रति कुटुंब, प्रति वर्ष पाच लक्ष रुपये अशा स्वरुपात मिळते.
जिल्ह्यातील तीन लाख ४० हजार ८३४ पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डांचे वितरण केले. पंतप्रधान जनआरोग्य योजनेचा लाभ मिळण्यासाठी आयुष्मान कार्ड आवश्यक असून, पात्र नागरिकांनी आपले कार्ड त्वरित काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुंभार यांनी केले.
‘आयुष्मान भव’ या मोहिमेत ‘आयुष्मान आपल्या दारी’ उपक्रम जिल्हाभरात राबविला जात आहे. त्याचप्रमाणे, मोबाइल ॲपद्वारे स्वत:चे कार्ड काढता येते. अकोला जिल्ह्यात महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत २१ अंगीकृत रुग्णालये आहेत.
कार्ड कसे काढावे?
गुगल प्ले स्टोअरमधून आयुष्मान ॲप इन्स्टॉल करावे. युजर लॉगिन तयार करण्यासाठी मोबाइल नंबर टाईप करून त्यानंतर मिळालेला ओटीपी टाकावा. सर्च पर्यायाद्वारे नाव, आधार क्रमांक व शिधापत्रिका ऑनलाईन आयडीच्या आधारे पात्रता तपासावी. पात्र असल्यास मोबाइल ओटीपी, फिंगर, फेस ऑथच्या माध्यमातून पडताळणी पूर्ण करता येते, अशी माहिती योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ. अश्विनी खडसे यांनी दिली.