नागपूर : राष्ट्रपती चार जुलैला नागपूर व गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत. चार तारखेला त्यांचा मुक्काम नागपूरच्या राजभवनावर आहे. या वास्तूला १२५ वर्षांचा इतिहास आहे. भारतीय तसेच पाश्चात्य वास्तूशैलीचा मिलाफ असलेली ही वास्तू आहे. भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील मुंबई व पुणे येथील राजभवनांच्या तुलनेत सर्वात मोठी आहे.
नागपुरातील राज भवन हे राज्यपालांचे निवासस्थान असले तरी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधान नागपूर भेटीवर असताना त्यांचेदेखील निवासस्थान असते हे विशेष. ब्रिटीशांनी नोव्हेंबर १८६१ मध्ये सेंट्रल प्रोविंसेस (मध्य प्रांताची) निर्मिती केल्यावर या प्रांताच्या आयुक्तांच्या (कमिश्नर) निवासस्थानासाठी ही वास्तू बांधली होती. तेव्हाचे मध्यप्रांतांचे आयुक्त ए. पी. मॅकडोनेल या वास्तूतील प्रथम निवासी होते. १९०३ मध्ये वऱ्हाडप्रांत (बेरार) मध्यप्रांताला जोडण्यात आला. या प्रदेशाचे नामकरण सी.पी. अँड बेरार प्रांत असे झाले आणि १९२० पासून ही वास्तू मध्यप्रांताच्या राज्यपालांचे ‘गव्हर्नमेंट हाऊस’ म्हणून ओळखली जाऊ लागली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ती मध्यप्रदेशच्या राज्यपालांचे निवासस्थान झाले. १९५६ मध्ये नागपूर द्विभाषिक मुंबई राज्याला जोडल्यानंतर ती मुंबई राज्याच्या राज्यपालांचे ‘गव्हर्नमेंट हाऊस’ झाले. १९६० साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली व ही वास्तू महाराष्ट्राच्या राज्यपालांचे नागपुरातील निवासस्थान झाले.
हेही वाचा – नागपूर : अपघातग्रस्त बसचे बुकिंग कार्यालय बंद, नातेवाईकांचा संताप
९४ एकराचा परिसर, चार प्रवेशव्दार
नागपुरातील राजभवन सुमारे ९४ एकर परिसरात आहे व त्याला चार प्रवेशद्वारे आहेत. येथे दरबार हॉल व बॅन्क्वेट हॉल आहेत. इमारतीच्या खाली तळघर आहे. संपूर्ण इमारत कौलारू आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात येथील राजभवनात हत्तीखाना होता. त्या जागी आज विस्तारित पाकगृह आहे. परिसरात पंचधातूपासून बनविलेली एक मोठी तोफ आहे. त्या लगत एक ध्वजस्तंभ असून तो नागपुरातील सर्वात उंच आहे.
हेही वाचा – बस अपघात: नागपूर जिल्ह्यातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी येथे संपर्क साधावा
७० एकरात जैवविविधता उद्यान
२०११ साली राजभवनाच्या ७० एकर परिसरात एक भव्य जैव विविधता उद्यान आहे. त्यात ३० हजार विविध प्रजातींची वनसंपदा असून ‘नक्षत्र वन’, ‘निवडुंग वन’, फुलपाखरू उद्यान, गुलाब उद्यान, औषधी वनस्पती उपउद्याने विकसित करण्यात आली आहेत.