नागपूर : लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान बुधवारी राहुल गांधींनी सदनातून बाहेर पडताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना ‘फ्लाइंग किस’चे हावभाव केले अशी त्यांनी तक्रार केली आहे. त्यानंतर आता ‘फ्लाइंग किस’ हा शब्द सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चिला जात आहे.
जगभरात ६ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय चुंबन दिन साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन आठवड्यात १३ फेब्रुवारीला ‘किस डे’ साजरा करतात. तसेच ६ जुलै देखील आंतरराष्ट्रीय चुंबन दिवस म्हणून साजरा केला जातो. वर्षातून दोनदा हा दिवस साजरा करण्यामागचे कारण म्हणजे चुंबनाला निरोगी मार्गाने प्रोत्साहन देणे हा आहे. लहान बाळाला आपण प्रेमाने फ्लाइंग किस देतो. तसेच प्रियकर प्रेयसीसुद्धा एकमेकांना फ्लाइंग किस देत प्रेम व्यक्त करत असतात.
चुंबनाचे प्रकार व अर्थ :
1) दूरवरून हवेत चुंबन (फ्लाइंग किस)
जेव्हा कोणी तुम्हाला स्पर्श न करता दूरवरून हवेत चुंबन घेतो तेव्हा त्याला फ्लाइंग किस म्हणतात. याचा अर्थ तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. तसेच तुमच्यापासून त्या व्यक्तीस दूर राहायचे नाही, असा त्याचा अर्थ होतो.
2) कोळ्यासारखे अचानक कडकडून चुंबन (स्पायडर किस)
जर कोणी अचानक तुम्हाला मागून मिठी मारली आणि नंतर चुंबन घेतले तर त्याला स्पायडर किस म्हणतात. याचा अर्थ संबंधित व्यक्ती तुमच्यावर खूप प्रेम करतो. हे नात्यातील आपुलकी दर्शवतो.
3) कपाळाचे चुंबन (फोरहेड किस)
जर तुमचा पार्टनर तुम्हाला कपाळावर किस करत असेल तर समजून घ्या की तुम्ही त्यांच्यासाठी खूप खास आहात. तो तुमचा मनापासून आदर करतो आणि तुम्हाला गमावू इच्छित नाही. हे किस जोडीदार किंवा प्रियकर यांच्यातच असले पाहिजे असे नाही, मित्र आणि आई-वडीलही प्रेम व्यक्त करण्यासाठी हे करू शकतात.
4) गालाचे चुंबन (चीक किस)
जेव्हा एखाद्याला आपण आवडतो तेव्हा तो गालावर किस करतो. अशा परिस्थितीत जर कोणी तुम्हाला गालावर किस करत असेल तर समजून घ्या की त्याचे तुमच्यावर प्रेम आहे. बहुतेक मित्र, भागीदार, पालक प्रेमाने तुमच्या गालावर किस करत असतात.
5) हाताचे चुंबन (हँड किस)
एखाद्याच्या हातावर किस करण्याचा असा अर्थ होतो की समोरची व्यक्ती तुमच्यावर इम्प्रेस झाली आहे आणि ती तुम्हाला डेट करू इच्छित आहे. त्याला तुमच्यासोबतचे नाते पुढे आणखी घट्ट करायचे असून उत्कृष्ट बाँडिंग तयार करायची आहे. याशिवाय वडिलधाऱ्यांना किंवा एखाद्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठीही हाताचे चुंबन घेतले जाते.
6) ओठांचे चुंबन (लिप किस)
तुमच्या मनातील प्रेम पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी लिप किसिंग केले जाते. आता असे गरजेचे नाही की जोडप्यांनीच एकमेकांच्या ओठांचे चुंबन घेतले पाहिजे. अनेक देशांमध्ये, विशेषतः परदेशात, पालक आपल्या मुलांच्या ओठांवर चुंबन घेऊन त्यांचे प्रेम व्यक्त करतात. अशाप्रकारे प्रत्येक किसचा वेगळा अर्थ आहे.
असा आहे इतिहास :
चुंबनाचा इतिहास आपल्याला रोमांचित करणारा आहे. पहिले चुंबन कोणी घेतले असावे याबाबत जाणकार, तज्ज्ञांचे वेगवेगळे मत आहे. प्रियकराने प्रेयसीचे घेतलेले चुंबन असो वा आईने बाळाला घेतलेले चुंबन यात प्रेम हीच भावना कायम असते.
असे समजले जाते की चुंबनाची सुरुवात आईने मुलाला घास भरविण्यापासून झाली असावी. चिंपाझी प्राण्यात अशा प्रकारे जेवण भरवले जाते. चिंपाझी माता आपल्या पिल्लांचे लाड करताना चुंबनही घेते. असेही असू शकते की आपण आपल्या पूर्वजांकडून म्हणजे या चिंपाझीला पाहून चुंबन घेण्यास सुरुवात केली असावी.
हेही वाचा – जुन्या खासगी वाहनांच्या नोंदणीचे नियम बदलले, माहिती आहे का?
दुसऱ्या मतानुसार चुंबन निव्वळ एक अपघातच आहे. टेक्सास ए एंड एम यूनिवर्सिटीचे मानववंश शास्रज्ञ यांच्या अभ्यासानुसार मानवाने एकमेकांचा वास घेताना अचानक एकमेकांचे चुंबन घेतले असावे, येथूनच सुरुवात झाली असावी चुंबनाची.
असे म्हटले जाते चुंबनाची सुरुवात अशाच प्रकारे आपल्याच देशातून झाली असावी. नंतर प्राचीन ग्रीक आपल्या येथे आले आणि चुंबनाची पद्धत तिकडे त्यांच्या देशात घेऊन गेले असावेत.
आता भले चुंबनाला प्रेम व्यक्त करण्याची एक सुंदर भावना म्हटले जाते. तेव्हा असे नव्हते. कमीत कमी जुन्या काळात तरी असे नव्हते. मध्य काळात युरोपमध्ये याला ग्रिटिंग वा सदिच्छा म्हणूनच पाहिले जायचे. जे कनिष्ट वर्गाचे लोक उच्च वर्गाच्या लोकांसाठी करायचे. दोन समान दर्जाचे लोक एकमेकांना भेटताना एकमेकांच्या कपाळाला किंवा ओठांना चुंबन घ्यायचे. तर केवळ कनिष्ट वर्गाचा व्यक्तीच उच्च व्यक्तीच्या हाथाचे, पायाचे किंवा कपड्याच्या कोपऱ्याचे चुंबन घ्यायचा.
सुमारे दशकभरापूर्वी फ्रान्सने चुंबनाला आपल्या डिक्शनरीत समाविष्ट करीत त्याला गलॉश असे नाव दिले. आता पश्चिमेकडील अनेक देश फ्रेंच किसवर आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. रोमन शासक टायबेरीअस याने ओठांच्या चुंबनावर बंदी घातली होती. कारण याद्वारे आजार पसरण्याचा धोका होता. येथूनच मग गालांचे चुंबन घेण्याची प्रथा सुरू झाली. जे आता पाश्चात्य देशांसह आपल्या येथेही चांगलेच प्रचलित आहे.
१७ व्या शतकात प्लेगने थैमान घातले होते. त्यामुळे ब्रिटनसह अनेक देशांनी चुंबनावर कायद्याने बंदी घातली. याचे पालन न करणाऱ्यास जबर दंडही होता.