नागपूर: एका ओळख असलेल्या परिचारिकेला कारमधून फिरायला नेऊन शारीरिक संबंधाची मागणी करीत कारमध्येच तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. परिचारिकेने त्याला प्रतिकार केला असता तिच्यावर विटेने हल्ला करत जखमी केले. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. दिलीप कृष्णराव ठवकर (४५, वाठोडा) असे आरोपीचे नाव आहे.

पीडीत २१ वर्षीय तरुणी उमरेड येथे परिचारिका असून ती दुर्गादेवी विसर्जनासाठी मिरवणुकीत गेली होती. तेथे आरोपी दिलीप ठवकर हा आला. गेल्या एका वर्षांपासून परीचारिकेशी संपर्कात होता. तिच्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते. त्याने तिला शुक्रवारी फिरायला चलण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले व तिला निर्जन जागी नेऊन तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच कारमध्येच तिचे हात पकडून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा… उपराजधानीत कॅफेच्या आड हुक्का पार्लर सुरू!

तिने विरोध केला असता त्याने तिच्याशी अश्लील चाळे केले. तिने संबंधासाठी नकार दिल्यामुळे चिडलेल्या दिलीपने जवळ पडलेली वीट तिच्या डोक्यात मारली व तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तिने कशीबशी स्वत:ची सुटका केली व त्यानंतर वाठोडा पोलीस ठाणे गाठून त्याच्याविरोधात तक्रार नोंदविली. पोलिसांनी दिलीपविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.