चंद्रपूर:राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेखी चिल्लर माणूस असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी गरळ ओकणारा, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा फरार प्रशांत कोरटकर हा राज्याच्या पोलीस विभागाला चांगलाच चकमा देत आहे.

कोल्हापुर पोलीस दलाचे एक पथक त्याच्या शोधार्थ चंद्रपुरात येवून ठाण मांडून आहे. दरम्यान कोरटकर हा ११ ते १५ मार्च या कालावधीत पोलीस मुख्यालयासमोरील हॉटेल सिध्दार्थ प्रिमीयर येथे मुक्कामी होता. सट्टा व्यावसायिक धीरज चौधरी व प्रशिक पडवेकर यांचा पाहुणचार घेत होता अशी माहिती पोलीस तपासात समोर आली असून पोलीसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेल ताब्यात घेतले आहेत.

मुळचा हिंगणघाट येथील रहिवासी असलेला व चंद्रपुरच्या सरदार पटेल महाविद्यालयातील जनसंवाद विद्या विभागात बावीस वर्षापूर्वी तासीका तत्वावर काम करणारा प्रशांत कोरटकर हा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देवून २५ फेब्रुवारी रोजी पसार झाला. तेव्हापासून पोलिस त्याचा शोध घेत आहे. आज जवळ जवळ एक महिन्यापासून कोरटकर हा पोलिसांना गुंगारा देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेखी चिल्लर असलेल्या या व्यक्तीच्या मागे राज्याची पोलीस यंत्रणा लागली आहे.

मात्र अजूनही पोलीसांना त्याला अटक करण्यात यश आलेले नाही. त्याला कारण पोलीसच कोरटकर याला मदत करित असल्याची चर्चा आहे. राजकीय पक्षांनी तसा आरोप देखील केला आहे. कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने कोरटकर याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर आहे. चंद्रपुरात कोरटकरणे पाहुणचार घेतला असे वृत्त लोकसत्ताने प्रकाशित केल्यानंतर आता कोल्हापूर पोलीस दलाचे एका पथकाने चंद्रपुरात ठाण मांडले असून त्याचा शोध घेत आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या माहितीनुसार अंतरिम जामीन मंजुर असताना कोरटकर ११ ते १५ मार्च या कालावधीत चंद्रपुरातील हॉटेल सिध्दार्थ प्रिमीयर मध्ये मुक्कामी होता. पोलीस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार सट्टा व्यावसायिक धीरच चौधरी यानेच सिध्दार्थ प्रिमीयम या हाॅटेलमध्ये रूम बुक केली होती. त्यानंतर कोरटकर व पडवेकर या दोघांचे ११ मार्च रोजी रात्री १०.३० ते ११ वाजताच्या सुमारास आगमन झाले. त्यानंतर सलग दोन दिवस दोघेही हॉटेलातच मुक्कामी होते. या दोन दिवसात दोघेही हॉटेलमधील रूमच्या बाहेर पडले नाही.

चहा, नास्ता व जेवणापासून सर्व रूममध्येच केले. या दोघांना भेटण्यासाठी दोन दिवसात काही लोक आले होते. विशेष म्हणजे एका पोलीस अधीकाऱ्यानेही या कालावधीत कोरटकर याची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. हा पोलीस अधीकारी कोण याचाही तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घेत आहे. कोरटकर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या सुपाऱ्या घेत असल्याचा आरोपही आहे. या अधिकाऱ्यानेही मोक्याच्या पोलिस ठाण्यात आपली वर्दी लागावी, यासाठी त्याची भेट घेतल्याचे समजते.

या हॅाटेलचे मालक सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची अत्यंत घनिष्ट संबंध ठेवून आहेत. त्यामुळेच कोरटकर यांनी मुक्कामासाठी हॉटेल सिध्दार्थ प्रिमीयरची निवड केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान प्रस्तुत प्रतिनिधीने हॉटेलला भेट देवून अधिक माहिती घेतली असता, १३ मार्च रोजी कोरटकर व पडवेकर यांनी हॉटेल सोडले. मात्र हॉटेल सोडतांना त्यांनी शहरात आणखी कोणते चांगले हॉटेल आहे याचीही माहिती घेतली. त्यामुळे दोघांनी सिध्दार्थ प्रिमीयर सोडल्यानंतर दुसऱ्या हॉटेलात मुक्काम ठोकल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान कोल्हापुर पोलीस दलाचे एक पथक चंद्रपुरात आले आहे. या पथकाने पोलीस अधीक्षक तथा स्थानिक गुनहे शाखेशी संपर्क साधून माहिती जाणून घेतली. तसेच हॉटेलला भेट देवून चौकशी केली व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.

पोलीस पथकांनी केली ताडोबातील रिसोर्टची तपासणी

सिध्दार्थ प्रिमीयर हॉटेल सोडल्यानंतर प्रशांत कोरटकर याने ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील रिसोर्टमध्ये दोन दिवस मुक्काम केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन पोलीस अधिकाऱ्यांचे एक पथक ताडोबा येथे चौकशीसाठी गेले होते. तिथे त्यांनी काही रिसोर्टची चौकशी केली. दरम्यान पोलीस अधीक्षक यांनी रिसोर्टचे नाव सांगितले नाही. पोलीस पथकांनी ताडोबातील रिसोर्टची तपासणी केली हे सांगितले.

महागड्या वस्तूंचा शोक

कोरटकर यांना अतिशय महागड्या वस्तूंचा शोक आहे. त्यामुळे हॉटेलच्या रूम मध्ये चर्चा करतांना आठ लाखाचा गॉगल घातलेला आहे. हातावरील घडीची किंमत लाखोची आहे. तसेच चार चाकी वाहन आणि इतरही महागड्या वस्तु असल्याचे त्याने सांगितले अशी माहिती समोर आली आहे.