लोकसत्ता टीम
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लिल शिवीगाळ करणाऱ्या तथाकथित पत्रकार आरोपी प्रशांत कोरटकर याला अटक करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. कोरटकरला कोणत्याही क्षणी कोल्हापूर पोलीस अटक करु शकतात.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी ब्राह्मण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप करीत तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने फोन करून थेट जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत सावंत यांनी एक ‘कॉल रेकॉर्डिंग’ फेसबुकवर शेअर केली होती. ज्यामध्ये “जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा, असे म्हणत या कोरटकर यांनी सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. तसेच कोरटकर याने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले असे या ध्वनिफीत मधून दिसून येते.
या प्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकाच्या नेतृत्वात पथक बुधवारी दुपारी नागपूरच्या दिशेने निघाले. उद्या गुरुवारी कोरटकरचा सायबर पोलिसांच्या मदतीने शोध घेणार आहेत. त्याला अटक करुन कोल्हापूर पोलीस घेऊन जाणार आहेत. कोरटकरचा कोल्हापूर पोलिसांनी अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे पोलिसांचा कोरटकरला अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, तो गेल्या महिन्याभरापासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन लपून बसला आहे.
रिकाम्या हाताने परतले होते कोल्हापूर पोलीस
यापूर्वीसुद्धा कोल्हापूर पोलिसांचे पोलीस उपनिरीक्षक संतोळ गळवे यांच्या नेतृत्वातील पथक नागपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी कोरटकरच्या घरावर छापा घातला होता. त्यानंतर सायबर पोलिसांच्या मदतीने काही ठिकाणी छापेमारी केली होती. मात्र, कोरकटर मिळून आला नव्हता. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांच्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले होते, हे विशेष.
आरोपी प्रशांत कोरटकर याला शोधण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक उद्या गुरुवारी धडकणार आहे. त्याचा सायबर पोलिसांच्या मदतीने शोध घेण्यात येणार आहे. नागपूर सायबर पोलिसांना कोरटकरचा सीडीआर आणि लोकेशनबाबत मदत मागितली आहे. कोरटकरचा सुगावा लागताच अटक करून कोल्हापूरला नेण्यात येईल. -संतोष गळवे (पोलीस उपनिरीक्षक, कोल्हापूर पोलीस)