नागपूर : अमरावती येथून मुबईसाठी विमानसेवा १६ एप्रिल पासून सुरू झाल्यानंतर आता बरोबर महिन्यांनी नागपूरहून कोल्हापूर विमानसेवा सुरू करण्यासाठी मुहूर्त सापडला आहे. त्यामुळे अमरावती ते मुंबई प्रमाणे ‘उडान’ योजनेअंतर्गत कोल्हापूर ते नागपूर विमान सेवा सुरु होत आहे.राज्याची उपराजधानी नागपूरशी आता कोल्हापूर हवाई सेवेद्वारे जोडले जाणार आहे. येत्या १५ मेपासून नागपूर-कोल्हापूर सेवेला प्रारंभ होणार असून, यामुळे उद्योग, व्यापार, पर्यटनाला चालना मिळणार आहे. आठवड्यातील पाच दिवस ही सेवा सुरू राहणार असून, स्टार एअरवेजच्या विमानात १२ बिझनेस क्लास आणि ६४ इकॉनॉमी क्लास आसन व्यवस्था असेल.

कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण गतीने सुरू आहे. त्यामुळे धावपट्टी विस्तारीकरण, नाईट लॅण्डिंग, आधुनिक अग्निशमन वाहन, नवी टर्मिनल बिल्डिंग अशी कामे मार्गी लागली आहेत. विमानतळावरील भौतिक सुविधांसह विविध मार्गावर हवाई सेवा प्रस्तावित आहे. त्याचा फायदा करवीर निवासिनी श्री अंबाबाई, दख्खनचा राजा जोतिबा दर्शनाबरोबरच एकूणच पर्यटनाला चालना मिळण्यासाठी ही विमानसेवा उपयुक्त ठरणार आहे. नागपूरमध्ये विविध शासकीय विभागांची मुख्यालये आहेत. त्यामुळे शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांबरोबरच विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला या विमानसेवेमुळे कनेक्टिव्हिटीसाठी मोठा फायदा होणार आहे. कोकण पचासाठीही ही सेवा उपयुक्त ठरणार असून कोल्हापुरातील मेडिकल टुरिझम वाढण्यासाठीही मदत होणार आहे. पाठपुरावा गतीने सुरू आहे.

कोल्हापूर ते नागपूर विमानसेवा सुरू होत आहे. येत्या १५ मे पासून मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे आठवड्यातील पाच दिवस स्टार एअरवेजकडून कोल्हापूर-नागपूर-कोल्हापूर विमानसेवा सुरू होत आहे. नागपूरहून सकाळी दहा वाजता विमान उड्डाण करेल आणि सकाळी साडेअकरा वाजता कोल्हापुरात येईल तर सकाळी बारा वाजता कोल्हापुरातून विमान उड्डाण करेल आणि दुपारी दीड वाजता विमान नागपूरमध्ये पोचेल. या विमानात बारा बिझनेस क्लास आणि ६४ इकॉनॉमी क्लास आसने असतील, या नवीन विमानसेवेमुळे कोल्हापूरच्या व्यापार, उद्योग, पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल.