दोन बंद संच पुन्हा सुरू, ग्राहकांना दिलासा
महाराष्ट्रात मागणीच्या तुलनेत उपलब्ध वीज पुरवठय़ात सुमारे साडेपाच हजार मेगावॅटची तफावत आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात भारनियमन सुरू झाले असून काही भागात ते वाढवण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर नागपूरच्या कोराडी वीज केंद्रातील बंद असलेल्या दोन वीज निर्मिती संचातून वीज उत्पादन सुरू झाले असल्याने राज्यातील लक्षावधी नागरिकांना काही प्रमाणात ऐन उन्हाळ्यात दिलासा मिळणार आहे. शिवाय राज्याला ३०० मेगावॅट जास्त वीजही उपलब्ध होणार आहे.
राज्यात काही भागात दुष्काळासह विविध कारणाने पाण्याची उपलब्धता मोठय़ा प्रमाणावर कमी झाली आहे. त्यामुळे तिरोडय़ातील अदानीसह काही खासगी व शासकीय वीज केंद्रात उत्पादन कमी वा बंद करण्यात आले आहे. उत्पादन घटल्याने राज्यात मागणी असलेल्या १७,३१८ मेगाव्ॉट विजेच्या तुलनेत सध्या केवळ ११,७५२ मेगाव्ॉटच्या जवळपास वीज उपलब्ध आहे. त्यात महानिर्मितीकडून उत्पादित होणाऱ्या साडेपाच हजार आणि खासगी कंपन्यांकडून उत्पादन होणाऱ्या साडेचार हजारांच्या जवळपास मेगाव्ॉट विजेचा समावेश आहे. मान्सूनपूर्वी पाण्याच्या तुटवडय़ाने वीज उत्पादन आणखी कमी होवून भारनियमन वाढण्याचा धोका व्यक्त केल्या जात होता. परंतु आता कोराडी वीज केंद्रात वीज उत्पादन वाढल्याने हा धोका अंशत: कमी झाला आहे.
कोराडीत प्रत्येकी २१० मेगाव्ॉटचे हे दोन्ही संच राज्य वीज नियामक आयोगाने निर्धारित केलेल्या मेरीट ऑर्डर डिस्पॅच (एम. ओ. डी.)मध्ये बसत नसल्याने १८ फेब्रुवारी व २ मार्च २०१६ पासून अनुक्रमे आरक्षित विराम कारणास्तव बंद करण्यात आले होते. १३ मे रोजी, २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ७ व १६ मे रोजी २१० मेगाव्हॅट क्षमतेचा संच क्रमांक ५ कार्यान्वित करण्यात आला आहे. या संचांतून नव्याने वीज उत्पादन सुरू झाले आहे. वीज उत्पादनातील अस्थिर आकार (व्हेरिएबल कॉस्ट) खर्च कमी करून, स्पर्धात्मक दरात हे संच आल्याने वीज उत्पादन सुरू करण्यात आल्याचा दावा कोराडीतील वरिष्ठ अधिकारी करत आहे. दोन ते अडीच महिन्यांपासून बंद असलेले संच तातडीने सुरू करणे व स्पर्धात्मक दरात निर्मिती कार्यात उतरविणे हे आव्हानात्मक काम येथील अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ यांनी पूर्ण केल्याबद्दल कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता प्रभाकर निखारे व उमाकांत निखारे यांनी संबंधितांचे अभिनंदन केले आहे. संच सुरू झाल्याने अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ व विशेषत्वाने येथील कंत्राटी कामगारांना रोजगार उपलब्ध झाल्याने आनंदाचे वातावरण आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा