नागपूर : महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात ६६० मेगावाॅटच्या दोन नवीन संच उभारणीला पर्यावरणवाद्यांच्या विरोधानंतरही केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी या प्रकल्पावरून सरकार आणि पर्यावरणवाद्यांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने कोराडीतील प्रस्तावित ६६० मेगावाॅटच्या दोन नवीन संचांना १९ सप्टेंबरला पर्यावरणीय मंजुरी दिली. त्याबाबत महानिर्मितीकडून मंगळवारी (२४ सप्टेंबर) माहिती देण्यात आली. या प्रकल्पाला नागपूरसह विदर्भातील पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही हा प्रकल्प इतरत्र उभारण्याबाबत ऊर्जामंत्र्यांना पत्र दिले होते. या प्रकल्पाबाबत झालेल्या जनसुनावणीतही पर्यावरणवाद्यांनी प्रकल्पाला विविध कारणे पुढे करत कडाडून विरोध केला होता.

हेही वाचा – ऑनलाईन रमी हा खेळ संधीचा की कौशल्याचा भाग ? राज्य सरकाला भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

ही जनसुनावणी अवैध असल्याचे सांगत पर्यावरणवाद्यांकडून त्याला उच्च न्यायालयातही आवाहन दिले गेले. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यानंतरही या प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी मिळाल्याने पर्यावरणवादी संतापले आहेत. दरम्यान, काही पर्यावरणवादी या प्रकरणाला उच्च न्यायालयात आवाहन देणे, काही रस्त्यावर आंदोलन करणे तर काहींकडून हे प्रकरण राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे नेण्याची तयारी सुरू झाली आहे. पर्यावरणवाद्यांकडून एकत्र येत कृती समिती तयार करण्यावरही काम सुरू झाले असून विधानसभा निवडणुकीपूर्वी या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

पर्यावरणवाद्यांचा दावा काय?

नागपूर जिल्ह्यात बुटीबोरीतील रिलायन्स, मिहानमधील अभिजित एनर्जी व आयडियल एनर्जीसह बरेच खाजगी प्रकल्प बंद आहेत. त्यानंतरही सरकार कोराडीत ६६० मेगावॅटचे दोन नवीन संच स्थापित करण्याचा हट्ट धरत आहे. जगात कुठेही ३० लाखांची लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प नसून नागपूर याला अपवाद आहे. पूर्वीच्या वीज प्रकल्पामुळे येथे कर्करोगासह इतरही रुग्ण वाढले. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारतातील सर्वाधिक तापमान वाढणाऱ्या जिल्ह्यात विदर्भातील सात जिल्हे आहेत. त्यानंतरही नागपुरातील कोराडीत नवीन प्रकल्पाचा आग्रह चुकीचा आहे.

हेही वाचा – Mumbai Rains : अंधेरीत उघड्या नाल्यात पडून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू

प्रकल्पाला विरोध

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकारी लपवालपवी करतात. प्रकल्प रेटून नेल्यास न्यायालयीन लढा लढणार प्रकल्प होऊ देणार नाही. – दिनेश नायडू, व्हीकॅन, नागपूर.

मुंबईत प्रकल्प उभारा

औष्णिक विद्युत प्रकल्पातून विदर्भाच्या वाट्याला धूळ, राख, प्रदूषण येईल. प्रकल्पासाठी सिंचनाचे पाणी दिले जाईल. त्यामुळे हा प्रकल्प पश्चिम महाराष्ट्र वा मुंबईत उभारावा. – प्रताप गोस्वामी, राष्ट्रीय सचिव, किसान मंच (व्ही.पी. सिंग)

कोराडीतील ६६० मेगावाॅटच्या दोन संचांना केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. दोन्ही संच अत्याधुनिक पद्धतीचे असून येथे पर्यावरण मंत्रालयाच्या हवा प्रदूषण मानांकन मर्यादित राहण्याकरिता अत्याधुनिक ईएसपी व एफजीडी यंत्रणा संचासोबतच लागणार आहे. त्यामुळे प्रदूषणाचा त्रास नाही. येथे नागपूर शहराचे सांडपाणी प्रक्रिया करून वापरले जाणार असून शुद्ध पाण्याचा वापर होणार नाही. या प्रकल्पाबाबत सर्व प्रक्रिया पारदर्शी असून सर्व नियमांचे पालन केले गेले आहे. – डॉ. नितीन वाघ, कार्यकारी संचालक, पर्यावरण व सुरक्षा, महानिर्मिती, मुंबई.