अकोला : हनुमान जयंतीनिमित्त अकोला जिल्ह्यातील कोथळी बु. येथे गुरुवारी माकडांची शिस्तबद्ध पंगत बसली होती. वानरसेनेने रांगेत बसून स्टीलच्या ताटात प्रसाद ग्रहण केला. या अनोख्या महाप्रसादाची चांगलीच चर्चा होत आहे.
जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात कोथळी बु. येथे निसर्गरम्य व घनदाट वृक्षछायेखाली अवगया मुंगसाजी माऊली संस्थान आहे. या संस्थानमध्ये हनुमान जयंतीनिमित्त गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. केवळ भाविकांसाठीच नव्हे तर परिसरातील माकडांसाठीदेखील महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले. एका रांगेत स्टीलच्या ताटामध्ये महाप्रसाद वाढण्यात आला. संस्थानचे पुजारी रामदास महाराजांनी परिसरातील माकडांना महाप्रसादासाठी निमंत्रित केले.
परिसरातील सर्व माकडांनी येऊन शिस्तीमध्ये महाप्रसादाचा आस्वाद घेतला. माकडांना पुन्हा पदार्थ वाढण्यात येत होते. महाप्रसाद ग्रहण करून परिसरातील वानरसेवा तृप्त झाली. दरम्यान, बाजूलाच भाविकांच्यादेखील पंगती उठल्या. या अनोख्या महाप्रसादाच्या पद्धतीची समाजमाध्यमातून चांगलीच चर्चा होत आहे.