गोंदिया : आदिवासींचे श्रध्दास्थान कचारगड येथे माघ पौर्णिमेला सोमवार १० फेब्रुवारी पासून कोयापुनेम महोत्सवाला सुरुवात झाली. तो पाच दिवस चालणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने आदिवासी आपल्या कुलदैवतेचे स्मरण करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून कचरागड येथे दाखल होतात. दरवर्षी माघ पौर्णिमेला गोंडी धर्मपरंपरा, बोलीभाषा, पूजन – विधी, नृत्यकला, संस्कृतीचे दर्शन येथे घडते. उत्सवाला कचारगड यात्रा असे नाव दिले आहे.
सालेकसा तालुक्यातील दरेकसापासून ५ किमी अंतरावर असलेल्या महाराष्ट्र – छत्तीसगड व मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांच्या टोकावरील पर्वतरांगेत असलेल्या विशालकाय गुहेत कचारगड येथे आदिवासी गोंड समाजाच्या कुलदैवतेचे निवासस्थान मानले जाते. कचारगड येथे आशिया खंडातील सर्वांत मोठी गुहा, उंच पर्वतरांगा, घनदाट जंगल आहे .नैसर्गिक सौंदर्याने नटलेला कचारगड परिसर पर्यटकांचेही लक्ष वेधून घेतो. आज पासून पुढील पाच दिवस चालणाऱ्या या कचारगड यात्रेत देशभरातील आदिवासी गोंड समाजाचे नेते, मंत्री, खासदार, आमदार, शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, सचिव, आयुक्त, जिल्हाधिकारी भेट देतात.
पाच ते सहा लाखांवर भाविक येतात
यात्रेला दरवर्षी पाच ते सहा लाख लोक भेट देतात. १९८४ पासून पाच लोकांना घेऊन सुरू झालेली यात्रा आज पाच लाखांहून जास्त भाविकांवर पोहोचली आहे. जवळपास १८ राज्यांतील गोंडी भाविक बंधू – भगिनी आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी येथे येतात. यात महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, बिहार, झारखंड, ओडिशा, बंगाल, उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, कर्नाटक, नागालैंड, गुजरात आदी राज्यांतील आदिवासींचा समावेश आहे.
जादा एस. टी बसेस आणि रेल्वेचा थांबा…
कचारगड येथे आयोजित या जत्रेसाठी एसटी विभागाकडून जादा बसेसचीही व्यवस्था करण्यात आली आहे. जी गोंदिया ते कचारगड, आमगाव ते कचारगड आणि सालेकसा ते कचारगड आणि कचारगड ते सालेकसा, कचारगड ते आमगाव आणि कचारगड ते गोंदिया अशी धावेल. यावर्षीपासून रेल्वेने पण या मार्गावरून धावणाऱ्या काही जलद गाड्यांचा थांबा दरेकसा रेल्वे स्थानकावर घोषित केला आहे.संपूर्ण उत्सव विविध रंगीबेरंगी व्यवसाय आणि लहान आणि मोठ्या व्यवसायांना रोजगाराचे साधन प्रदान करतो. तसेच गोंडी साहित्य, कला, पुस्तकांचे स्टॉल, वेशभूषा, आयुर्वेदिक वनौषधी इत्यादी खरेदीसाठी जवळील परिसरातील इतर लोकही येथे येतात.