या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : माणसात परिस्थितीशी संघर्ष करण्याची जिद्द असेल तर दगडालाही पाझर फुटू शकतो. अशाच प्रकारे खडतर आव्हानांना तोंड देत क्रितिका अग्रवाल या विद्यार्थिनीने आयआयएम नागपूरमधून पदव्युत्तर पदवी मिळवली. क्रितिका गर्भवती असताना तिने ‘आयआयएम’मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. प्रसूतीनंतर आपल्या इवल्याशा लेकीसह येथील वसतिगृहात राहून ‘आयआयएम’ सारख्या जगविख्यात संस्थेतून दोन वर्षांची पदवी प्राप्त केली.

नागपूरच्या मिहान परिसरातील भारतीय व्यवस्थापन संस्थेचा (आयआयएम) रविवारी दीक्षांत सोहळा पार पडला. त्यात क्रितिका अग्रवालला पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रमाची पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी क्रितीकाने आपल्या दोन वर्षांतील संघर्षाची कहाणी कथन केली. त्यानुसार क्रितिकाने २०२० ते २०२२ या करोनाच्या दोन वर्षाच्या काळात ‘आयआयएम’ नागपूरमध्ये शिक्षण घेतले. २०२० मध्ये प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. त्यावेळी ती गर्भवती होती. अशा परिस्थितीत शिक्षणाला महत्त्व द्यावे की कुटुंबाला? असा प्रश्न तिच्यासमोर निर्माण झाला होता. मात्र, तिने दोन्ही आव्हाने स्वीकारण्याचे ठरवले. यात सासर आणि माहेरच्या मंडळींनीही तिला साथ दिली. ‘आयआयएम’ला प्रवेश घेतल्यावर काही महिन्यांनी क्रितीकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचा सांभाळ करताना ‘आयआयएम’सारख्या संस्थेत शिक्षण घेणे, रोजच्या शैक्षणिक आव्हानांना तोंड देणे हा सारा संघर्ष तिच्या समोर होता. मुलीला दुसरीकडे ठेवून शिक्षण घेणेही शक्य नव्हते. त्यामुळे तिने काही महिने ‘आयआयएम’च्या वसतिगृहामध्ये मुलीसह राहण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान न डगमगता शिक्षण पूर्ण केले. रविवारी झालेल्या दीक्षांत सोहळ्यामध्ये पदवी घेताना तिच्या चेहऱ्यावर या संघर्षाचा आनंद अनेकांना प्रेरणा देणारा होता.

आव्हानांना आपली ताकद बनवा

‘आयआयएम’मध्ये यशस्वीरित्या शिक्षण पूर्ण करणे सोपे नाही. मात्र, माझी मुलगी माझी ताकद होती. गर्भवती असताना शिक्षण सोडण्याचा विचारही मनात न येऊ देता त्यालाच आपली ताकद बनवून पुढे गेले. आज मिळालेल्या यशामागे कुटुंबीयांची मदत झाली, असे क्रितिकाने सांगितले. आयुष्यात पुढे जायचे असेल तर आपल्याला आव्हाने पेलावीच लागतील असा संदेशही तिने दिला.