नागपूर : धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आंबी या छोट्या खेड्यात जन्मलेल्या कुलदीप आंबेकर उच्च शिक्षणासाठी पुण्यात आला. स्पर्धा परीक्षांचा काही काळ अभ्यास केला. परिस्थितीचे कोणतेही भांडवल न करता सामाजिक काम करण्याचा निर्धार केला. सातत्याने केलेल्या कामामुळे समाजाने आणि विद्यार्थ्यांनी त्यांना स्वीकारले. आज त्यांच्या कार्याची पावती म्हणजे ब्रिस्टॉल विद्यापीठात ‘शिक्षण धोरण आणि आंतरराष्ट्रीय विकास’ या विषयात एम.एस्सी. करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्तीवर निवड झाली.

ग्रामीण भागातील मुले मोठी स्वप्ने घेऊन शहरात येतात. त्यांना योग्य दिशा मिळावी, चांगले शिक्षण मिळावे, आणि दोन वेळच्या जेवणाची सोय व्हावी, यासाठी गेल्या दहा वर्षांपासून स्टुडंट हेल्पींग हँड या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कुलदीप आंबेकर सकारात्मक काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. विशेषतः फूड स्कॉलरशिप, सर्व प्रकारच्या शासकीय शिष्यवृत्ती, वसतिगृह विद्यार्थ्यांना मिळवून देणे, करोना काळात विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क माफ करणे, दुष्काळी परिस्थितीत विद्यार्थ्यांना सर्वत्परी सहकार्य करणे, आरोग्य सर्वेक्षणातून विद्यार्थ्यांच्या समस्यांना वाचा फोडणे, रचनात्मक काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

ब्रिस्टॉल विद्यापीठातील या अभ्यासक्रमामुळे शिक्षण व्यवस्था, धोरणे आणि विकासाच्या कार्यपद्धती यांचा सखोल अभ्यास करण्याची संधी आंबेकर यांना मिळाली. शिक्षण धोरणांची रचना, अंमलबजावणी आणि मूल्यमापन कसे होते, याचे सखोल ज्ञान मिळेल. शिक्षणातील असमानता समजून घेऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांना कसे उपलब्ध होईल, यासाठी आंबेडकर यांनी ठोस पावले उचलण्याचा निर्धार केला आहे. परदेशातील शिक्षण केवळ वैयक्तिक उन्नतीसाठी नाही, तर महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत सुधारणा घडवण्यासाठी आवश्यक धोरणे, संकल्पना आणि उत्तम प्रथा शिकून त्या आपल्या समाजात रुजवण्यासाठी माझा प्रयत्न असेल असे आंबेकर यांनी सांगितले. माझ्या आई-वडिलांनी मला या सर्व प्रवासात नेहमीच साथ दिली. हे त्यांच्या आशीर्वादामुळेच करू शकलो. माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवला.

हा प्रवास केवळ माझ्या वैयक्तिक यशाचा नाही, तर ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण आहे. यामुळे हे सिद्ध झाले की लहान गावांतूनही मोठी स्वप्ने पाहता येतात आणि योग्य मार्गदर्शन आणि दृढ इच्छाशक्तीने ती साकारही करता येतात. शिक्षण हे फक्त वैयक्तिक उन्नतीचे साधन नसून, संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा मूलभूत आधार आहे असे आंबेडकर यांनी सांगितले.

Story img Loader