बुलढाणा : मुंबईच्या वेशीवर धडकलेल्या हजारो शेतकऱ्यांना पनवेल नजीकच्या नढळ येथे आज, बुधवारी पहाटेपासून एकाच ठिकाणी पोलिसांनी अडकवून ठेवले. शांततेत आंदोलन करणार आहोत, असे सांगूनही पोलिसांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आणि शेतकऱ्यांना रोखून धरले. यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला. रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांना अटक करण्यात आली. मात्र, बीड येथील कार्यकर्त्यांनी अरबी समुद्रात सातबारा आणि सोयाबीन, कापूस बुडवून प्रतिकात्मक आंदोलन केलेच. बुधवारी दुपारी रखरखत्या उन्हात तुपकर व हजारो महिला- पुरुष शेतकऱ्यांनी पोलिसांचा विरोध झुगारून मुंबईच्या दिशेला जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या संख्येने असलेल्या पोलिस आणि आंदोलक शेतकरी यांच्यात संघर्ष झाला.
हातात दंडूके घेतलेले पोलीस आणि घोषणा देणारे शेतकरी यांच्यात तब्बल तासभर घमासान सुरू होते. आम्हाला गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असे म्हणत तुपकर भूमिकेवर ठाम होते. यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत रविकांत तुपकर, ऍड शर्वरी तुपकर, प्रदेशाध्यक्ष राजू कसबे, नारायण लोखंडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना अटक केली. आंदोलक १८ मार्चला बुलढाण्यातून अडीचशे गाड्यांनी मुंबईकडे कूच करणार होते. मात्र, आदल्या दिवशी मध्यरात्री कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस मागावर असल्याने तुपकर भूमिगत होत गनिमी काव्याने मुंबईत दाखल झाले. त्यांच्यापाठोपाठ राज्यभरातील हजारो कार्यकर्ते मिळेल त्या वाहनाने पोलिसांची नजर चुकवत मुंबईत आले.
पनवेल नजिक असलेल्या एका मंदिर संस्थानात शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि महिला मुक्कामी थांबले होते. या ठिकाणी अर्ध्या रात्री खालापूर पोलीस ठाणे व मुंबईतील शेकडो पोलीस दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना आहे तिथेच थांबवून ठेवले. दरम्यान, दुपार झाली तरी पोलीस बाहेर पडू देत नसल्याने शेवटी तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी अरबी समुद्राकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. अतिशय रखरखत्या उन्हात पोलिस आणि शेतकरी कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला. तब्बल तासभर पोलीस व शेतकरी यांच्यात संघर्ष सुरू होता.
शेतकरी घोषणा देत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते तर शेकडो पोलिसांची बटालियन काठ्या आडव्या लावून त्यांना मागे सारत होती. शेवटी तुपकर व त्यांच्या अनेक सहकारी कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करत खालापूर पोलीस ठाण्यात अटक करून नेले.
बिडच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलेच
दरम्यान याउप्परही बीडचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे शिलेदार कुलदीप करपे व त्यांचे सहकारी बुधवारी दुपारी मुंबई पोलिसांची तटबंदी भेदत बोटीद्वारे अरबी समुद्रात उतरले. त्यांनी अरबी समुद्रात कर्जाचा बोजा असलेल्या सातबारा तसेच घरात पडून असलेला कापूस व सोयाबीन अरबी समुद्रात बुडवले. यावेळी आम्ही कर्जमुक्त होणारच अशा घोषणा दिल्या. तसेच तुपकर व आंदोलक शेतकऱ्यांना खालापूर पोलिसांनी बळाचा वापर करून केलेल्या बेकायदेशीर अटकेचा जाहीर निषेध नोंदवला. गुंगारा देऊन तुपकर समर्थकांनी समुद्रात प्रतिकात्मक आंदोलन केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.