अमरावती : वीज वाहिनीचा सिमेंट खांब सरळ करत असताना तो तुटून तरुणाच्या अंगावर पडला. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना धनोरा फसी ते जयसिंगा मार्गावर घडली. मृत तरूण महावितरणने कंत्राट दिलेल्या एका खासगी कंपनीकडे मजुरी काम करत होता. या प्रकरणी लोणी पोलिसांनी एका व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संकेत उर्फ दीप राधेश्याम गाठे (१९, रा. ढवलसरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा फसी ते जयसिंगा मार्गावरील वासुदेव सैरिसे यांच्या शेतात ही घटना घडली.
याप्रकरणी गौरव गाठे यांच्या तक्रारीवरून लोणी पोलिसांनी दिनेश मनोहर वसंतकार (रा. अकोला) याच्याविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. संकेत हा महावितरणची निविदाधारक असलेल्या लक्ष्मी एंटरप्रायजेस, अकोला या कंपनीसाठी मजुरीचे काम करत होता. तो महावितरणच्या बडनेरा उपविभागातील जयसिंगा शिवारात काम करत होता. तेथील जुना विजेचा सिमेंट खांब दोरीने बांधून सरळ करण्याकरिता ओढत होता. अचानक तो खांब खालच्या बाजूने तुटून संकेतच्या तोंडावर पडला, त्यामुळे तो रक्तबंबाळ होऊन घटनास्थळीच ठार झाला.