चंद्रपूर : महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या दुरुस्ती व देखभाल अवस्थेत असलेल्या ५०० मेगावॉटच्या संच क्रमांक ५ मधील कोल मीलमध्ये काम करीत असताना एक मजूर २२ मीटर उंचीवरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. सचिन गोवर्धन (रा. दुर्गापूर) असे मृताचे नाव आहे.
हेही वाचा- अरेरे! असे मरण वैऱ्यालाही नको देवा; मधमाशांच्या भीषण हल्ल्यात वृद्धाचा करूण अंत
सचिन गोवर्धन हा महाऔष्णिक विद्युत केंद्रात पेटी कंत्राटदारामार्फत काम करीत होता. रविवारी संच क्रमांक ५ हा देखभाल व दुरुस्तीसाठी बंद होता. या बंद संचाची स्वच्छता करण्यासाठी सचिन कोल मीलमध्ये गेला होता. अंदाजे २० ते २२ मीटरवर उंचीवर जाऊन काम करीत असताना तोल गेल्याने तो २२ मीटरवरून खाली पडला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालय तथा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, अवघ्या एक ते दीड तासातच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी कंत्राटी कामगारांनी केली आहे. या घटनेमुळे महाऔष्णिक विद्युत केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.