यवतमाळ : जिल्ह्यात खुनाचे सत्र पुन्हा सुरू झाले. आर्णी तालुक्यातील राणी धानोरा येथे खुनाची घटना उजेडात आल्यानंतर आज सोमवारी सकाळी यवतमाळच्या औद्योगिक क्षेत्रात मजुराचा खून करण्यात आला. यवतमाळ शहरालगत लोहारा एमआयडीसी परिसरात धारदार शस्त्राने वार करून या युवकाचा खून करण्यात आला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी लोहारा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला आहे
विनोद शिपलेकर (२५, रा. कोलाम पोड, लोहारा) असे मृताचे नाव आहे. तो एमआयडीसीमध्ये एका कंपनीत मजूर म्हणून काम करीत होता. अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने वार करुन विनोदचा खून केला. आज सोमवार सकाळी ८ वाजता ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलीस ठाण्याच्या निरीक्षक यशोधरा मुनेश्वर व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला. विनोदचा खून कोण व का केला याबाबत लोहारा औद्योगिक क्षेत्रात विविध चर्चा सुरू आहे.
दरम्यान, लोहारा एमआयडीसी परिसरात विनोद
शिपलेकर या युवकाचा खून झाला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधिक्षक पियूष जगताप, उपविभागीय पोलीय अधिकारी दिनेश बैसाणे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. विनोदचे मारेकरी परिसरातीलच असावे अशी चर्चा असून, पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत. या प्रकरणी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
यवतमाळ शहरात गेल्या काही वर्षात खुनाच्या घटना सतत घडत आहेत. काही दिवसांत या घटना कमी झाल्या होत्या. मात्र गेल्या आठवडाभरात पुन्हा खुनाच्या दोन घटना घडल्या. यवतमाळच्या गुन्हेगारीबाबत दोन वर्षांपूर्वी राज्याच्या विधिमंडळातही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तेव्हा तत्कालीन गृहमंत्र्यांनी यवतमाळच्या गुन्हेगारीचा बीमोड करण्याचे आश्वासन सभागृहात दिले होते. मात्र संघटित गुन्हेगारीसह, वाळू माफिया, भूमाफिया, अल्पवयीन गुन्हेगार, महिलांवरील अत्याचार, चोरी आणि सातत्याने होत असलेले खून अशा गुन्हेगारीकरणामुळे यवतमाळमध्ये कायम दहशतीचे वातावरण असते. त्यामुळे पोलिसांनी शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर उपाययोजन करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.