शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे गरीब कर्करोगग्रस्ताला चांगले उपचार मिळावे, त्यांच्या आजाराचे तत्काळ व अचूक निदान व्हावे म्हणून कोटय़वधींचे उपकरण शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु येथील विकृतीशास्त्र विभागात ‘इम्युनो हिस्ट्री केमेस्ट्री’ या यंत्रावरील निदानासाठी आवश्यक रसायन पुरवण्यात येत नसल्यामुळे कर्करोगग्रस्तांच्या चाचण्या बंद ठेवाव्या लागत असल्याची माहिती आहे. गरीब कर्करोगग्रस्तांना मेडिकल हा एकमेव आधार असताना तेथेच चाचण्या वेळेवर होत नसतील तर मेडिकलचे प्रशासन त्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे.
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) कमी खर्चात तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळत असल्याने महाराष्ट्रातील विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यातून रोज मोठय़ा संख्येने कर्करुग्ण येथे येतात. येथील कर्करोग विभागात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना कर्करोग आहे किंवा नाही, यासाठी त्या विभागाकडून मेडिकलच्या विकृतीशास्त्र विभागात विविध चाचण्यासाठी नमुने पाठवण्यात येतात. परंतु घेतलेले नमुने तपासणीसाठी आवश्यक रसायन आणि साहित्य सामुग्री शासनाकडून या विभागाला उपलब्ध करून देण्यात येत नाही. यामुळे रुग्णांचे कर्करोग निदान होत नाही. येथे निदान व उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना चाचण्यांसाठी बाहेरचा रस्ता दाखवण्यात येत असल्याचीही माहिती उघडकीस आली आहे.
बायोकेमेट्री विभागासाठीही प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेतून ‘बेकमन कॉल्टर’ या कंपनीचे स्वयंचलित असे अद्यावत ‘एन्लायझर’ यंत्राची खरेदी करण्यात आली आहे. या यंत्राचे वैशिष्टे म्हणजे, एका तासात दोन हजारावर नमुने हे यंत्र तपासते.
नमुन्याचा अहवालही अचूक देते. याशिवाय थायरॉईडची चाचणी करणारे यंत्र सिमेन्स कंपनीचे आहे. या दोन्ही यंत्रासाठी आवश्यक रसायने (रिएजंट किट) उपलब्ध करून दिली गेली नव्हती.
वृत्तपत्रांनी ही बाब प्रकाशात आणल्यानंतर रिएजंट किट उपलब्ध करून देण्यात आली. तीच परिस्थिती आता विकृतीशास्त्र विभागात निर्माण झाली आहे. या विभागात कर्करुग्णांच्या चाचणीचे काम वेळेत होणार की नाही हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

रसायन कधी मिळणार ?
बायोजेनिक स्लाईड, आयएचपी वॉशिंग बफर, एॅन्टी इआरबी, एॅन्टी इआर, एॅन्टी पीआर, एचआरपी किटची मागणी विकृतीशास्त्र विभागाकडून करण्यात आली. मात्र अद्याप हा पुरवठा झाला नाही. यामुळे गरीबांच्या कर्करोगाचे निदान व्हायला विलंब होतो. निदान उशिरा होत असल्यामुळे कर्करुग्णांच्या जीवाला धोका होण्याची भीती आहे.

Story img Loader