राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात सुरू असलेल्या ७२व्या ‘इंडियन फार्मास्युटीकल कांग्रेस’मध्ये नियोजनाचा अभाव दिसून आला. शनिवारी दुपारी जेवणाच्या दालनासमोर अनेक विद्यापीठांचे कुलगुरू, संशोधकांनाही ताटकळत उभे राहावे लागले. जेवणाच्या ठिकाणी अन्नाचा अपुरा पुरवठा व झालेली गर्दी सांभाळणे आयोजकांना कठीण झाल्याने आलेल्या मान्यवरांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.
‘इंडियन फार्मास्युटीकल कांग्रेस’चे शुक्रवारी उद्घाटन झाले. विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात सुरू असलेल्या या अधिवेशनामध्ये विशेष अतिथींसाठी जेवणाचे वेगळे सभागृह ठेवले आहे. विद्यार्थ्यांसाठी वेगळे सभागृह आहे. अतिथींसाठीच्या सभागृहात जेवण करणाऱ्यांची नोंदणीही आधीच झाली आहे. त्यामुळे आयोजकांना तसा अंदाज यायला हवा. मात्र, असे असतानाही जेवणाच्या सभागृहात प्रचंड गर्दी झाली. शुक्रवारप्रमाणे शनिवारीही अनेकांना तासभर रांगेत सभागृहाच्या बाहेर जेवणासाठी ताटकळत उभे राहावे लागले.